Sangli Samachar

The Janshakti News

हिंदू धर्म अन् अहिंसेच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींना धर्मगुरुंनी घेरले; अभ्यास करण्याचा दिला सल्ला


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३ जुलै २०२४
संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणाने काल संसद गाजली. राहुल यांनी आपल्या भाषणातून थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. आपल्या भाषणादरम्यान राहुल यांनी भगवान शिवाच्या अभयमुद्रेचा उल्लेख केला.

विशेष म्हणजे, त्यांनी भगवान शिवाचा फोटोही दाखवला. मात्र यास सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी तीव्र विरोध केला. सुमारे 1.42 तास चाललेल्या राहुल यांच्या भाषणादरम्यान स्वतः पंतप्रधान मोदींनी आसनावरुन उठून आक्षेप नोंदवला. राहुल यांनी आपल्या भाषणात विविध धर्मांचा उल्लेख केला. मात्र आता, राहुल यांना धर्मगुरुंनी अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे.

संपूर्ण समाजाची बदनामी आणि अपमान केल्याचा आरोप

राहुल गांधींच्या भाषणावर स्वामी अवधेशानंद गिरी म्हणाले की, 'हिंदूंना प्रत्येकामध्ये देव दिसतो, हिंदू अहिंसक आणि उदार आहेत. हिंदूचे म्हणणे आहे की, संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे आणि त्यांनी नेहमी सर्वांच्या कल्याणासाठी, आनंदासाठी आणि सन्मानासाठी प्रार्थना केली पाहिजे. मात्र, हिंदूंना हिंसक म्हणणे किंवा ते द्वेष पसरवतात असे म्हणणे योग्य नाही. ते असे वक्तव्य करुन संपूर्ण हिंदू समाजाची बदनामी करत आहेत. हिंदू समाज खूप उदारमतवादी आहे. तो असा समाज आहे, ज्यामध्ये सर्वांचा समावेश होतो आणि सर्वांचा आदर केला जातो.'


संपूर्ण हिंदू समाज दुखावला गेलाय !

ते पुढे म्हणाले की, 'राहुल गांधी आपल्या भाषणादरम्यान वारंवार सांगत होते की, हिंदू हिंसक आहेत आणि हिंदू द्वेष उत्पन्न करतात...मी त्यांच्या या शब्दांचा निषेध करतो. त्यांनी हे शब्द मागे घ्यावेत. त्यांच्या या भाषणामुळे संपूर्ण हिंदू समाज दुखावला गेला आहे. त्यांनी याबद्दल माफी मागावी.'

इस्लाममध्ये अभयमुद्राचे उल्लेख नाही !

अखिल भारतीय सुफी सज्जादंशीन परिषदेचे अध्यक्ष सय्यद नसरुद्दीन चिश्ती म्हणाले की, ''संसदेत बोलताना राहुल गांधी यांनी इस्लाममध्ये अभयमुद्रा असल्याचे म्हटले आहे. इस्लाममध्ये मूर्तीपूजेचा उल्लेख नाही, तसेच चलनही नाही. मी त्यांच्या या वक्तव्याचे खंडन करतो. इस्लाममध्ये अभयमुद्राचा उल्लेख नाही. राहुल गांधींनी आपले विधान दुरुस्त करावे, असे मला वाटते.''

तर दर्गा अजमेर शरीफचे गद्दी नाशीन हाजी सय्यद सलमान चिश्ती म्हणाले की, "आम्ही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे विधान ऐकले आहे. त्यांनी 'अभयमुद्रा'चे प्रतिक इस्लामिक प्रार्थना किंवा इस्लामिक उपासनेशी जोडण्याबाबत आपल्या भाषणात उल्लेख केला. मात्र कोणत्याही प्रतीकात्मक मुद्रेचा इस्लामच्या तत्त्वज्ञानाशी आणि श्रद्धेशी संबंध जोडणे योग्य नाही.''

संपूर्ण माहितीशिवाय कोणत्याही धर्माबद्दल बोलू नये

बिहारमधील गुरुद्वारा पटना साहिबचे अध्यक्ष जगज्योत सिंह म्हणाले की, ''विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने धर्मांबाबत वस्तुस्थिती सभागृहात मांडली, माझ्या मते त्यांना योग्य माहिती नाही. अपूर्ण माहिती, चुकीची माहिती त्यांनी सभागृहात मांडली. शीख, हिंदू किंवा इतर कोणताही धर्म असो, कोणत्याही धर्माबद्दल संपूर्ण माहिती असल्याशिवाय बोलू नये. पूर्ण माहिती घेऊनच बोलावे.''

राहुल यांनी 'त्या' पीडितांची माफी मागावी

जगज्योत सिंग म्हणाले की, 'ते हिंसेबद्दल बोलले हे खूप चांगले आहे, परंतु 1984 मधील शीख हिंसाचाराबद्दल त्यांना कदाचित माहिती नाही. मला त्यांना सांगायचे आहे की, अनेक पीडितांचे कुटुंबीय दिल्लीतच राहत आहेत. राहुल गांधींनी एकदा त्यांच्याकडे जाऊन त्यांची माफी मागावी.'

राहुल संसदेत काय बोलले  ?

तत्पूर्वी, हिंदू धर्म आणि भगवान शिवाच्या अभयमुद्रेचा उल्लेख करताना राहुल गांधी म्हणाले की, भगवान शिव, गुरु नानक, येशू ख्रिस्त, भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांनी संपूर्ण जगाला अभयमुद्रेचा संदेश दिली. राहुल गांधींच्या मते, अभयमुद्रा म्हणजे घाबरु नका. आपल्या भाषणासोबतच राहुल यांनी लोकसभेत भगवान शिवाचा फोटोही दाखवला. त्यावर सत्ताधारी पक्षाकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही राहुल यांना फोटो न दाखवण्यास सांगितले. आपल्या भाषणादरम्यान राहुल म्हणाले की, अभयमुद्राच्या माध्यमातून संपूर्ण जगाला एक स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की भय आणि धमकावण्यास मनाई आहे.


राहुल यांचे भाषण सुरु असतानाच पंतप्रधान मोदी आसनावरुन उठून म्हणाले की, हा मुद्दा अतिशय गंभीर आहे. संपूर्ण हिंदू समाजाला विरोधी पक्षनेत्यांकडून हिंसक म्हणून संबोधित करण्यात आले, जे चुकीचे आहे. यावर राहुल म्हणाले की, 'हिंदू म्हणजे भाजप, आरएसएस आणि पीएम मोदी नाही.' गृहमंत्री शाह यांनीही राहुल यांनी माफी मागावी अशी मागणी केली.