| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. ३१ जुलै २०२४
दिवाळीच्या निमित्ताने शिवलेला नवीन शर्ट अंगावर चढवून एके दिवशी मी रस्त्यावरून चाललो होतो. वाटेत माझे एक परिचित मला भेटले व म्हणाले,
“राजा, तुझा हा शर्ट एकदम मस्त आहे, मला आवडला”.
माझ्या मनाचा एक कोपरा सुखावला.
मी तसाच चालत राहिलो. ब-याच लोकांच्या नजरा माझ्याकडे वळत आहेत हे मला जाणवले. कांही वेळाने आणखी एका परिचित मला भेटले व म्हणाले
“व्वा, राजा, छान शर्ट आहे तूझा ! राजा, मी नेहमी पाहतो, कपड्यांची तुझी निवड खूप चांगली असते आणि तुला ते शोभूनही दिसतात.”
माझ्या मनाचा कोपरा फिरून सुखावला. कांही दिवस असेच गेले. लोक स्तुती करत असलेला हा शर्ट माझाही आवडता झाला आणि वारंवार मी तो घालू लागलो. काही दिवसांनी माझा हा आवडता शर्ट घालून मी कुठेतरी जात असतांना एका परिचितांनी टिप्पणी केली,
“राजा, हा शर्ट सुंदर दिसत आहे, याचे मुख्य कारण, तू तो परिधान केला आहेस.”
या गृहस्थाचे शर्टाबाबतचे भाष्य व कांही लोकांनी पूर्वी केलेली स्तुती यावर मी विचार करू लागलो. विचारांच्या चक्राने वेग घेतला आणि दही घुसळल्यावर जसे लोणी वर येऊन तरंगू लागते तसे, माझ्या मनामध्ये विचार तरंगू लागले.
वस्त्र माणसाच्या देहावरील बाह्य आवरण, माणसाचा देह जीवावरील बाह्य आवरण.
वस्त्राचा रंग, त्यावरील नक्षी, कलाकुसर यामुळे वस्त्र सुंदर दिसते, मानवी देह नेसलेला जीव कशामुळे सुंदर दिसेल?
जीवावर मानवी देहाचे आवरण घालून त्याला पृथ्वीवर पाठविण्यामागे ईश्वराचा नेमका कोणता उद्देश असावा?
मानवी देहाचे आवरण असलेल्या जीवाने त्याच्या जीवनाची वाटचाल कशी करावी, काय करावे, कसे वागावे म्हणजे ते त्या जीवाला मानवी देहाचे आवरण शोभून दिसेल?
मानवी देहाचे आवरण असलेला जीव काय केले असता सर्वांना सुंदर दिसेल, सर्वांना आवडेल?
मनांत उद्भवलेल्या प्रश्नांवर मी विचार करत असतानां माझ्या मनातील 'तो' कोपरा प्रगट झाला व मला म्हणाला,
"राजा त्या परमदयाळू पित्याच्या, जगन्मातेच्या मनात आल्यावर तो एखाद्या सुक्ष्म जीवावर कृपा करतो आणि मानवी देहाचे आवरण त्याच्यावर घालून असीम ब्रह्मांडातील पृथ्वी नांवाच्या एका लहानशा ग्रहावर त्याला विशिष्ट उद्देशाने पाठवून देतो.
"नेसवुनी आवरण मानवी देहाचे पाठवि तो जीवाला
उद्देश त्याचा असतो, जीवाने जाणावे 'स्व'ला
असेल त्याचे जरी काळे, कुरूप, विद्रुप बाह्य रंग,
थांबेल त्याचे येथे येणे-जाणे ठेवता निर्मळ अंतरंग"
एवढे बोलून माझ्या मनातील 'तो' कोपरा आपल्या जागी परतला आणि मी 'स्व'ला कसे जाणावे, अंतरंग निर्मळ कसे ठेवता येईल यावर विचार करू लागलो.
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण