| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ जुलै २०२४
जिल्ह्यात दोन दिवस संततधार पाऊस सुरु झाला आहे. शिराळा तालुक्यात चरण, शिराळा, कोकरुड परिसरात अतिवृष्टी झाली आहे. वारणा-चांदोली धरण परिसरात चौवीस तासात १०४.८ मिली मीटर वाळवा तालुक्यातील बहे १२५.८ मि.ली., कासेगाव ९५.३ मि.ली., ताकारी परिसरात १२५.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या परिसरातील नागरिकांनी ढगफुटी सदृश्य असाच पाऊस होता, असे सांगितले. पावसाचा जोर वाढल्यामुळे सोमवारी दुपारी कृष्णा नदीची सांगली आयर्विन पुल येथे २६ फुटापर्यंत पाणीपातळी गेली होती. जिल्ह्यात सरासरी २८.२ मिलिमीटर पाऊस झाला असून कृष्णा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.
दरम्यान कृष्णा खोऱ्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णामाईने सोमवारी दत्तदर्शनासाठी औदुंबरच्या मंदिरात शिरकाव केला. नदीची पाणी पातळी रात्रीत ९ फूट ८ इंचांनी वाढली असून औदुंबरच्या दत्त मंदिर परिसरात पाणी शिरले. चांदोली धरणाच्या सांडव्यापर्यंत पाणी आल्याने कोणत्याही वेळी विसर्ग करण्यात येणार असल्याने वारणा काठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
औदुंबरनजीक भिलवडी पुलाजवळ काल सायंकाळी १९ फूट २ इंच असणारी पाणी पातळी सोमवारी सकाळी २८ फूट १० इंच झाली. नागठाणे बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला असून औदुंबरच्या दत्त मंदिर परिसरात कृष्णामाई शिरली आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात कोयना येथे १७६, महाबळेश्वरमध्ये २४५ आणि नवजामध्ये २३६ मिलीमीटर पाऊस झाला. धरणात ६०.४३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
वारणेवरील चांदोली धरणाजवळ ७८ मिलीमीटर पाऊस नोंदला असून सांडव्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज वक्राकार दरवाज्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याचे धरण व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले आहे. यामुळे वारणा नदीतील पाणी पातळी वाढणार असल्याने वारणाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इषारा देण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे सांगलीचा कसबे डिग्रज आणि मोजे डिग्रज हा बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे कसबे डिग्रज आणि मोजे डिग्रजचा संपर्क तुटलेला आहे. तर पलूस तालुक्यातील नागठाणे बंधाराही पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. बंधाऱ्यावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर पलूस तालुक्यातील नागठाणेचा वाळवा तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटला आहे.