| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरू - दि. १५ जुलै २०२४
‘ही शाळा विद्यार्थ्यांना वाईट सवयी सोडण्याचे शिक्षण देते’ वर्तमानपत्रातील ठळक अक्षरातील बातमीच्या मथळ्याने माझे लक्ष वेधून घेतले आणि मी ती बातमी - १ वाचू लागलो. ही बातमी बेंगलोरमधील एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या वाईट सवयी सोडवण्यासाठी राबविल्या जाणा-या उपक्रमांची माहिती देणारी होती.
बातमीमध्ये लिहीले होते, या शाळेत दस-याची सुट्टी सुरू होण्याच्या एक दिवस आधी ‘रामलीला’ उत्सव आयोजित केला जातो. या दिवशी सगळे विद्यार्थी आपल्या हातांमध्ये एक कागद घेऊन ओळीने रांगेत उभे असतात. या कागदावर मुलांनी; नखे कुरतडणे, शौचालयात उगाच जास्त वेळ बसणे, लहान भावंडाना त्रास देणे, वाईट हस्ताक्षर असणे अशा त्यांच्या लहान-सहान वाईट सवयीं पालकांशी व शिक्षकांशी चर्चा करून लिहीलेल्या असतात. प्रत्येक विद्यार्थी तिथे ठेवलेल्या अग्नीपात्रात त्याच्या हातातील वाईट सवय लिहिलेल्या कागदाचे म्हणजे प्रतिकात्मक रावणाचे दहन करतो आणि ही माझी वाईट 'सवयीचा रावण’, आता नष्ट झाला आहे, तो माझ्याकडे परत येणार नाही असा निश्र्चय करतो व आपल्या वर्गामध्ये परततो.
वाईट सवयी म्हणजे ‘रावण’ हे मुलांच्या मनावर ठसवण्यासाठी व त्या सुटण्यासाठी ही शाळा राबवत असलेल्या या उपक्रमाचे मला फार कौतुक वाटले. कौतुकाच्या या विचारात असतांना माझ्या मनातील ‘तो’ नेहमीचा कोपरा कुजबुजला,
“राजा, या लहान मुलांचे व शाळेतील या उपक्रमाचे तू फक्त कौतुक करत राहणार की तुझ्यातील ‘रावणा’चेही दहन करण्याचा प्रयत्न करणार?”
माझ्या मनातील ‘त्या’ कोप-याशी मी आता चांगला परिचित झालो असल्याने मी थोड्या सावधपणे त्याला विचारले,
“बाबारे, माझ्या या उतार वयातही तुला माझ्या वागण्यात ‘रावण’ दिसत आहे कां? मोघमात बोलू नको. जे सांगायचे आहे ते स्पष्ट सांग.”
माझ्या बोलण्यावर मिश्कीलपणे हसत माझ्या मनातील ‘तो’ कोपरा म्हणाला,
"राजा, मी काय किंवा तू काय, तरूण असो वा वृद्ध, सर्वांच्या मनांमध्ये कमी जास्ती प्रमाणात ‘रावण’ कुठे ना कुठे दडलेला आहे. त्याला आपण नष्ट करू शकत नाही. मला फक्त हे सांगायचे आहे की आपल्यातील ‘रावणा’ला आपण जरी समूळ नष्ट करू शकत नसलो, तरी दृढ निश्चयाने, मनाच्या खंबीरतेने किमान तो प्रकट होणार नाही, प्रबळ होणार नाही, आपल्यावर हावी होणार नाही यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.”
माझ्या मनातील ‘त्या’ कोप-याच्या ‘रावण आपल्यामध्ये आहे, त्याला समूळ नष्ट करता येत नाही, त्याला दूर ठेवले पाहिजे’ अशा वक्तव्याने मी जास्तच सावध झालो व म्हणालो,
“तुला नक्की काय सांगायचे आहे हे मला अजूनही कळले नाही. समजावून सांग”
"राजा, मला सांगायचे आहे की, सवयींचा अतिरेक म्हणजे व्यसन. मग ते कोणतेही असो, वाईट, अहितकारक, स्वतःला व इतरांना फक्त त्रास, दुःख देणारे, नुकसान पोहचवणारे.”
माझ्या मनातील ‘त्या’ कोप-याचे बोलणे मी मध्येच तोडले आणि त्याला विचारले,
“अरे, पण मला कोणते व्यसन आहे ? रेस, जुगार, पत्ते, धुम्रपान, दारू, ...... हे सारे तर दूर, मी सुपारीसुद्धा कधी खात नाही आणि तरीही तुला माझ्यात वाईट सवयींचा ‘रावण’ दिसत आहे ? मला वाटत, कांही तरी निमित्त काढून मला नांव ठेवायचे व्यसन तुलाच आहे.”
मी माझ्या नेहमीच्या पवित्र्यावर घसरलो.
“राजा, मला तुला किंवा अन्य कुणालाच नांवे ठेवायची नाहीत. मला फक्त तुला सावध करायचे आहे. ध्यानात ठेव. देवदूत आणि पशू यांचे मिश्रण म्हणजे माणूस.-२ आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगात चांगल्या व वाईट विचारांची बीजे आहेत. या दोहोत कोण जिंकणार याचा झगडा नेहमीच सुरू असतो आणि यातील एकाचे अस्तित्व दुसऱ्या शिवाय नसते.-३
आपण ज्या वेळी अज्ञानात असतो, आपल्याला पूर्ण माहिती नसते, आपण संभ्रमांत असतो, षड्रीपुंच्या अंमलाखाली असतो, जीवनातील घटनांनी आपले मन दुःखी, नाजुक, हळवे, दुर्बल झालेले असते, त्यावेळी आपल्या मनात काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभाचे, चुकीचे, नकारार्थी, सुडाचे, द्वेषाचे, इर्षेचे, अहंकाराचे, विचार व विकार उत्पन्न होतात.
हे असे जे विचार, खरं तर कुविचार; जे आहेत ना, हाच तर खरा ‘रावण’! वाईट विचार व सवयींचा हा ‘रावण’ मोठा मायावी आहे. वाईट, अहितकारक, फसवा, कपटी, लबाड, दगलबाज, भ्रामक आहे. त्याला वेळीच ओळख. कुविचार, कुविकार, षड्रिपु या अस्त्र-शस्त्रांनी युक्त असा हा ‘रावण’ आपल्या नकळत आपल्या मनात सामावून जातो, आपल्या मनाचा ताबा घेतो आणि आपल्याला त्याचा गुलाम बनवून अहितकारक, वाईट, पाशवी कृत्य करायला भाग पाडतो.
राजा, मनुष्याच्या हातून घडणारी वाईट, अहितकारक कृत्य त्याच्या मनातील या कुविचाररुपी ‘रावणाचे’ फलित असतात जी अशी कृत्य घडुन गेल्यावर त्यांची व परिणामांची जाणीव प्रत्येकाला होते. मग पश्चाताप होतो, दुःख होते. पण त्यावेळी खुप उशीर झालेला असतो. आणि हे सर्व घडते ते या कुविचाररूपी ‘रावणा’मुळे. या साठीच मी तुला सांगत आहे आपल्या मनात उमलणा-या प्रत्येक विचारांना ओळख. चांगल्या-वाईट विचारांत फरक कर. वाईट विचारांना तुझ्या विचारात-आचारात थारा देऊ नकोस.
नेहमी लक्षांत ठेव, आयुष्यामध्ये आपल्याला अनेक निवडी करायच्या असतात. कांही निवडी महत्वाच्या असतात तर कांही नसतात. आपल्या निवडीतील पुष्कळशा निवडी या चांगले किंवा वाईट या दोन्हीपैकी एक असतात.
आणि आपले सुख-दुःख आपण कोणाची निवड करतो त्यावर निश्चित होते. कारण आपल्या निवडीच्या परिणामाप्रमाणे आपल्याला जगावे लागत असते.-४
राजा, चांगले व वाईटातील निवड करायची शक्ति सर्वांच्यामध्ये आहे.-५ परमदयाळु ईश्वरांने दिलेल्या या शक्तिचा, विवेक बुद्धीचा वापर कर आणि कुविचारांच्या या ‘रावणाला’ समूळ नष्ट करता जरी आले नाही तरी, तो प्रकट होणार नाही, किमान त्याला पायबंद बसेल याची काळजी घे.” आपले बोलून संपवून माझ्या मनातील ‘तो’ कोपरा निघून गेला.
माझ्या मनातील ‘त्या’ कोप-याने केलेली सावधगिरीची सूचना मला मनोमन पटली व दिवसाच्या प्रत्येक क्षणी माझ्या मनात प्रकट होणा-या या कुविचाररुपी ‘रावणा’ला कसे ओळखायचे, त्याला आपल्यापासून दूर कसे ठेवायचे यावर मी विचार करू लागलो. आणि मग सुरूवात झाली एका न संपणा-या लढाईला.
- आजचे बोल अंतरंगाचे पुर्ण
संदर्भः १. टाईम्स ऑफ इंडीया बेंगलोर, २७-०५-२०१७. शाळा सिल्व्हर ओक, सरजापूर रोड, बेंगलोर.
२. Angles = Light Demons = Darkness, Humans = Light+Darkness - बेन सिझर, वचनेः
३.एरिक बुर्डन ४.जेम्स ई. फाउ्स्ट, ५. ओरिगन