| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जुलै २०२४
भारत सरकारचा उपक्रम असलेली, हेलिकॉप्टर निर्मिती बरोबर फायटर/ नागरी विमाने व इसरो साठी लॉन्चिंग व्हेईकल निर्माण करणारी जगातील मोठी कंपनी म्हणून नावारूपाला आलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड बरोबर सांगलीतील उद्योजकांना व्यवसाय करण्याची संधी मिळावी म्हणून हिंदुस्थान एरोनॉटिक्स चे स्वतंत्र संचालक श्री. दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या पुढाकाराने सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली, मिरज, कुपवाड, जयसिंगपूर, इचलकरंजी व परिसरातील उद्योगांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स बरोबर व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दोन दिवसीय विषय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सांगली मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
याबाबत अधिक माहिती देताना पाटील म्हणाले की, या कार्यक्रमांमध्ये शुक्रवार दि. 2 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी अडीच ते साडेतीन वा. इंजीनियरिंग चे सर्व विद्यार्थ्यांसाठी ओरिएन्टेशन प्रोग्रॅम आयोजित केला असून त्यामध्ये जिल्ह्यातील विविध इंजिनिअरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आली आहे. यामध्ये एरोनॉटिक्स कंपनीची माहिती आणि विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये उपलब्ध असणाऱ्या भविष्यातील संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तर दुपारी चार ते सहा वाजता सांगली व परिसरातील उद्योजकांना हिंदुस्थान एरोनॉटिक्सची माहिती देण्यात येऊन व्यावसायिक संधी या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, असे विनोद पाटील यांनी सांगितले.
या चर्चासत्रामध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स नाशिक प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साकेत चतुर्वेदी हे मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स चे विविध उपक्रम, त्यामध्ये असणाऱ्या संधी याबाबतचे सविस्तर माहिती देण्यात येणार असून उद्योजकांच्या शंकांचे निरसन देखील केले जाणार आहे, असेही विनोद पाटील म्हणाले.
शनिवार दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सांगली मिरज एमआयडीसी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, एमआयडीसी मिरज येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत व्यवसाय वृद्धीसाठी एकास एक मीटिंगचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून श्री पाटील म्हणाले की यामध्ये भेंडर रजिस्ट्रेशन, उपलब्ध संधी, मागणी असलेल्या आवश्यक यंत्रसामग्रीच्या खरेदी बाबत चर्चा, प्राथमिक करार इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक प्रकल्पाचे कार्यकारी संचालक शिरीष भोळे, महाव्यवस्थापक एस मंडळ व एस. ए. कोते यांच्यासह खरेदी विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार बैठकीस, हिंदुस्थान एरोनॉटिक्स चे स्वतंत्र संचालक श्री. दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर, सांगली मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष श्री विनोद पाटील, उद्योगजक माधव कुलकर्णी, उद्योजक डॉ भालचंद्र साठे, अमोल पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित व्यापारी केदार खाडीलकर हे मान्यवर उपस्थित होते.