| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ जुलै २०२४
ग्रामीण भागात असलेली शिवसेनेची ताकद कमी करण्याच्या छुप्या इराद्याने शरद पवार यांनी भाजपला धक्का देत महायुतीतून शिवसेना फोडली असल्याची चर्चा वारंवार रंगत आहे. गेल्या दोन वर्षात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे पंख छाटण्याचे अप्रत्यक्ष काम केल्याचे बोलले जाते. उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यात शीत युद्ध सुरू असल्याची वंदताही आहे. याचाच परिपाक म्हणजे शरद पवार यांनी पाठिंबा दिलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विजय मिळविल्यानंतर महाविकास आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी शरद पवारांनी डाव टाकत महाविकास आघाडीतल्या छोट्या घटक पक्षाचे म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना उमेदवारी देऊन मैदानात उतरवले होते. जयंत पाटील यांना निवडून आणून महायुतीला मोठा धक्का देण्याचा पवारांचा इरादा होता. पण प्रत्यक्षात पवारांना जयंत पाटील यांना निवडून आणता आले नाही. त्यांच्या इराद्यावर उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना निवडून आणून पुरते पाणी फिरवले.
विधान परिषद निवडणुकीत महायुतीला धोबीपछाड देण्याऐवजी ठाकरे - पवारांच्या उमेदवारांमध्येच लढत रंगली आणि त्यात उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराने शरद पवारांचा उमेदवार पाडला. दरम्यान काँग्रेसची 5 मते फुटली. प्रज्ञा सातव यांना दुसऱ्या पसंतीची 3 मते जादा मिळाल्याने मिलिंद नार्वेकर यांचा अखेरच्या टप्प्यात विजय झाला. यामागे उद्धव ठाकरे यांचीच खेळी असल्याचे बोलले जाते.