yuva MAharashtra गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट : क्वालिटी एज्युकेशन ब्रँड

गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट : क्वालिटी एज्युकेशन ब्रँड




| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २० जुलै २०२४
आज गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचा ३२ वा वर्धापन दिन ! संस्था, शाखा, सेवक आणि विद्यार्थी यांना हार्दिक शुभेच्छा !
---------------------------------

बँक बॅलन्स नव्हतं.. इमारत नव्हती.. एक आकडी विद्यार्थी आणि सेवक संख्या अशा प्रतिकूल परिस्थितीत होमिओपॅथी काॅलेजच्या माध्यमातून जीपीएमटी संस्थेची खडतर वाटचाल सुरू झाली. त्याला तीन दशकाहून अधिक काळ व्यतीत झाला. आज जीपीएमटी शैक्षणिक संकुलामुळे  मिरज विद्यानगरी म्हणून अधिक उठून दिसत आहे.या संस्थेचे संस्थापक चेअरमन मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांनी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, नर्सिंग,फिजिओथेरपी या शाखांमधून वैद्यकीय शिक्षण, डी. एड. व बी.एड कॉलेजच्या माध्यमातून शिक्षक प्रशिक्षण, सीबीएसई व स्टेट बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रिप्रायमरी व प्रायमरी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाची गौरवशाली परंपरा निर्माण करुन सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात  मानाचा तुरा खोवला आहे !

संस्था स्थापन करताना जरी पृथ्वीराज बाबांकडे आर्थिक आणि भौतिक सुविधांची रसद नव्हती तरी सहकार चळवळीतून महाराष्ट्राच्या प्रगतीत अत्यंत भरीव आणि लक्षवेधी योगदान राहिलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी खासदार आणि सहकार तपस्वी आणि पृथ्वीराज बाबांचे पूज्य आबा स्व. गुलाबराव पाटील यांच्या लोकसेवेच्या कार्याची प्रेरणा आणि त्यांनी दिलेला निःस्वार्थी कार्याचा वारसा आणि आत्मविश्वास यामुळेच जीपीएमटी विस्तारली आणि महाराष्ट्राच्या सेवेत हजारो डॉक्टर, नर्सिस, शिक्षक,प्राध्यापक, अभियंते क्लास वन अधिकारी आणि कुशल मनुष्यबळ लाभले हे संस्थेच्या माध्यमातून पृथ्वीराज पाटील यांची बहुजन समाजातील लेकरांना सामर्थ्य देणारी लक्षवेधी कामगिरी आहे. म्हणून संस्थेच्या स्थापनेत प्रेरणास्थान असलेले स्व. गुलाबराव पाटील यांच्या कार्याबद्दल प्रथम कृतज्ञता व्यक्त करणं हे आपले प्रथम कर्तव्य ठरते !

महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील तपस्वी म्हणून स्व.गुलाबराव पाटील यांनी सत्तर व ऐंशीच्या दशकात प्रचंड मेहनत घेऊन रचनात्मक कामाचा डोंगर उभा केला आहे.  १९५१ मध्ये ते सांगली नगरपरिषदेवर निवडून आले.. १९५४ते १९५५ या काळात नगराध्यक्ष झाले. आणि हिराबाग वाॅटर वर्क्सच्या माध्यमातून सांगली शहराला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा योजना साकारली. १९६० मध्ये जिल्हा नियोजन समितीचे सेक्रेटरी झाले. १९६५ मध्ये सांगलीत सहकार प्रशिक्षण केंद्र सुरू केले. १९६६ ते १९७८ अशी १२ वर्षे राज्यसभेचे खासदार म्हणून सभागृहात अभ्यासपूर्ण दमदार कामगिरी केली.

याच दरम्यान १९७३ ते १९७५ तीन वर्षे राष्ट्रीय सहकारी संघाचे सचिव म्हणून लक्षवेधी काम केले. सहकार व कृषी क्षेत्राच्या भल्यासाठी अमेरिका, इंग्लंड, कोरिया व जर्मनी देशांचा अभ्यास दौरा केला. १९८० ते १९८२ या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमनपद भूषविले. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून १४ वर्षे बँकेची चौफेर प्रगती केली.या काळात त्यांनी पहिल्यांदा ऊस व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कर्जे देऊन ग्रामीण भागातील शेतकरी सुखी केला. त्यांनी आजारी साखर कारखाना पुनर्वसन कमिटीचे चेअरमन म्हणून अनेक साखर कारखान्यांना जीवदान दिले. 

महाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजनेचे पहिले चेअरमन म्हणून गरीब.. विधवा व वंचित महिलांना पेन्शन सुरू केली.१९८१ मध्ये स्व. इंदिरा गांधी यांनी त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविली व नंतर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला लक्षणीय यश मिळाले. 

स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. बाळासाहेब देसाई, वैकुंठभाई मेहता, धनंजयराव गाडगीळ, वसंतदादा पाटील, बॅ. जी. डी. पाटील, आनंदराव चव्हाण, राजारामबापू पाटील, आबासाहेब शिंदे, तात्यासाहेब कोरे व यशवंतराव मोहिते अशा दिग्गज नेते व सहकारातील मान्यवरांच्या बरोबर त्यांनी काम केले आहे. सहकारातून गरीबी हटवता येते हा त्यांचा सिध्दांत होता, ते त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. 

राजकारणाचा उपयोग शंभर टक्के समाजकारणासाठी करुन त्यांनी सांगली जिल्ह्य़ातील जनतेचे भले तर केलेच केले त्याचबरोबर सहकारातून महाराष्ट्र पावरफूल्ल केला आणि भारताचा सहकार मजबूत केला आहे. त्यांच्या रचनात्मक कामाची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी म्हणून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते त्यांच्या ब्राँझच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा २१ जानेवारी २०१३ रोजी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात दिमाखात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सांगली जिल्हा सहकारी बोर्डानेही त्यांची स्मृती सन्मानाने जपली आहे. पुणे आणि सांगलीत त्यांच्या नावाने सहकारी गृहनिर्माण संस्था निर्माण करण्यात आल्या. सार्वजनिक क्षेत्रात त्यांची स्मृती अत्यंत आदराने जपली जाते. 

त्यांचे सुपुत्र मा. पृथ्वीराज बाबा पाटील हे पुणे विद्यापीठाचे औषधनिर्माण पदवीधर आहेत. दोन वर्षे तासिका तत्वावरील प्राध्यापक म्हणून सांगलीच्या आप्पासाहेब बिरनाळे फार्मसी काॅलेजवर काम करुन १९९१ मध्ये त्यांनी गुलाबराव पाटील होमिओपॅथी काॅलेज सुरू केले आणि २० जुलै १९९२ रोजी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टची स्थापना करुन पुढे फार्मसी, नर्सिंग, बी. एड. डी. एड. सी. बी. एस. ई. व राज्य मंडळ संलग्न इंग्रजी माध्यमाच्या शाळा, आय. टी. ट्रेनिंग, कनिष्ठ महाविद्यालय अशा विविध विद्याशाखा सुरू केल्या व त्या यशस्वीरीत्या चालवत उत्कृष्टपणे बहुजन समाजातील लेकरांचे शिक्षण करीत आहेत. 

स्व. गुलाबराव पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा निष्कलंक व निष्ठावंत नेता म्हणून सहकार व राजकारण अशा दोन्ही क्षेत्रात फार मोठी कामगिरी केली आहे.. आज पृथ्वीराज बाबा पाटील हेही राजकीय व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहेत. सरळमार्गी, निष्पाप व निर्मळ मनाच्या पृथ्वीराज बाबांनी मिरजेत जे गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल उभे केले आहे ते सांगली जिल्हा व मिरजेचे रचनात्मक वैभव आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून गुलाबराव पाटील यांचे जिवंत स्मारक घडविण्यासाठी अपार मेहनत घेतली आहे. आज या शैक्षणिक संकुलात सुमारे पाच ते सहा हजार विद्यार्थी शिकतात.. सुमारे ५०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रोजगार देऊन त्यांना स्वाभिमानाने जगण्याची संधी देऊन वडिलांची स्वप्नपूर्ती व त्यांची स्मृती जनकल्याणातून जपण्याची अवघड पण तितकीच महत्वाची कामगिरी करण्यात त्यांनी बाजी मारली आहे. 

सांगली जिल्हा शहर कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून ते अहोरात्र जनसेवेत आहेत. महापूर व कोरोना काळात त्यांनी त्यांच्या संस्था व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेला केलेली मदत पुरोगामी छ. शिवबांचा महाराष्ट्र व सांगलीकर कधीच विसरणार नाहीत. बाबांच्या संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे अत्यंत जबाबदारीने व मनोभावे सेवाभावी वृत्तीने काम करतात. सुपुत्र विरेंद्र हे त्यांच्या संस्था नेटवर्कमध्ये विश्वस्त म्हणून छान काम करतात. स्व.गुलाबराव पाटील हे काॅमन मॅनच्या भल्यासाठी राबले तोच वारसा आज गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पृथ्वीराज बाबा चालवित आहेत.

हक्काचा व प्रामाणिकपणे अडल्या नडल्या लोकांची कामे करणारा सेवाभावी.. निष्कपटी सरळमार्गी लोकसेवक म्हणून पृथ्वीराज बाबा काम करतात. दररोज अखंड दहा बारा तास काम आणि जनतेच्या कामासाठी सतत मुंबई पुण्याचे दौरे करताना ते कधी थकत नाहीत.. उदंड उत्साह आणि सकारात्मक कामकाज प्रणाली.. काँग्रेस पक्षातील राष्ट्रीय व राज्य स्तरावरील अनेक नेत्याशी सतत संपर्क आणि विचारविनिमय यामुळे कामाचा माणूस अशी त्यांनी स्वकर्तृत्वाने आपली प्रतिमा निर्माण केली आहे. 

पृथ्वीराज बाबांचे हे शैक्षणिक व जनकल्याणासाठी सुरु असलेले काँग्रेस पक्षाचे काम अधिक जोमाने चालत राहण्यासाठी आम्ही गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या ३२ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.. 

प्रा. एन. डी. बिरनाळे 
कार्यकारी अध्यक्ष, 
*महाराष्ट्र प्रदेश  काँग्रेस कमिटी शिक्षक विभाग. 
*जनसंपर्क अधिकारी 
पृथ्वीराज पाटील यांचे यशोधन सेवा व संपर्क कार्यालय सांगली 
८८८८४७५५५२