Sangli Samachar

The Janshakti News

'एक संदेश' त्या जगत् नियंत्यासाठीही पाठवायला हवा !


| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु- दि. ३ जुलै २०२४

एक संदेश, जो सर्वांनी आपल्या जगतनियंत्याला पाठविला पाहिजे !

त्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी जागे झाल्यावर माझ्या लक्षात आले बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करणारा माझा मुलगा काल रात्री घरी परतलेला नाही. माझ्या मुलाला मी चांगला ओळखतो. त्याचे गुण, दोष, कमजोरी, शक्ति सारे-सारे कांही मला माहित असल्याने मला काळजी वाटू लागली. माझ्या मनात अनेक विचारांनी थैमान घातलेः

‘काल रात्री माझा मुलगा घरी कां बरं परतला नाही? कांही अडचणीत तर सापडला नसेल? काय झालं असेल? अपघात?..... अरे देवा, तसे कांही झाले असेल तर ..... मनातल्या मनात मी परमेश्वराचा धावा सुरू केलाः भगवंता, जो कांही त्रास असेल तो मला होऊं दे, पण माझ्या मुलाला सुखरूप, सुरक्षित ठेव. काळजी करत मी परमेश्वराची प्रार्थना करत बसलो.

थोडया वेळाने बेडरुमचा दरवाजा उघडून माझी सून बाहेर आली. मी तिच्याकडे मुलाची चौकशी केली. तेव्हा तिने सांगितले की ,
“काल रात्रभर व आज पूर्ण दिवस ऑफीसमध्ये तो काम करणार आहे. काल मोबाईलवर फोन करून त्यांने मला सांगितले आहे. तुम्ही कांही काळजी करू नका.”

माझा मुलगा रात्री घरी परतला नसला तरी तो सुखरूप आहे, हे समजल्यावर माझा जीव भांड्यात पडला. मी परमेश्वराचे मनोमन आभार मानले. पण, कांही वेळाने परत एकवेळ माझ्या मनात विचारांची मालिका सुरू झाली.


तो सुखरूप आहे हे ठिक आहे. पण, रात्री त्यांने जेवण केले असेल कां ? की तसाच कांही न खाता-पिता, उपाशी काम करत बसला असेल, कुणास ठाउक ? नक्कीच रात्रभर तो न झोपता काम करत बसला असेल. सकाळी त्याला ब्रेकफास्ट, किमान एक कपभर चहातरी मिळाला असेल कां?

रात्रं-दिवस इतकं काम कशासाठी करायचं ? पैशासाठी ? पदासाठी ? प्रसिद्धीसाठी ? कशासाठी इतकी दगदग करायची ? मनाला, शरीराला इतके कष्ट कशासाठी द्यायचे ? कशाला ही अशी स्वतःची पिळवणूक करून घ्यायची ? विश्रांती म्हणून कसली ती नाही जीवाला. सारखी दगदग, धावपळ, ताण, तणाव. अरेरे, मुलाबाळांच्यात बसुन सुखा-समाधानाने, शांतपणे चार घाससुद्धा खाता येत नाहीत. हे कांही योग्य नाही. हे सारे थांबणे आवश्यक आहे. मला माझ्या मुलाला समजावून सांगितलेच पाहिजे.’

माझ्या मनाची बेचैनी व चिंता परत एकवेळ वाढु लागली आणि मनोमन कांही विचार करून मी मुलाला मोबाईलवर फोन लावला, आणि माझ्या मनातील रुखरुख त्याला बोलून दाखवली, तेव्हा तो म्हणाला.

“बाबा, मी आता मोठा झालो आहे. प्रकृतीची काळजी घेणं, सुखा-समाधानात राहणं, बरं-वाईट सर्व कांही मला कळतं, समजतं. तुम्ही कशाला उगाच काळजी करत बसता. सध्या ऑफीसमध्ये खुप महत्वाच्या मिटींग्ज चालू आहेत. त्यामध्ये मी खूप व्यस्त आहे. मी घरी आल्यावरही हे सर्व तुम्ही मला सांगू शकला असता. उगाच ऑफीसमध्ये कशाला फोन केलात?” मुलाचा नाराजीचा स्वर मला मोबाईलवरही स्पष्टपणे जाणवला.

“पोरा, तू मोठा झाला आहेस, तुला सर्व समजत, आपली काळजी कशी घ्यायची, सुखा-समाधानात कसं राहायचं, याच तुला ज्ञान आहे हे मलाही समजतं, पण काय करायचं, या म्हाता-या बापाचं मन मानत नाही रे. त्याला समजावता येत नाही बाळा.

सर्वच आई-वडीलांची इच्छा आपला मुलगा, मुलगी सुरक्षित, सुखा-समाधानात असावेत, त्यांना कसलाही त्रास, कष्ट नसावे अशी असते. त्यामुळे आपली मुल-मुली सुरक्षित, सुखरूप, सुखा-समाधानात असल्याचा एक संदेश, एक निरोप प्रत्येक दिवशी कशाही रितीने कां होईना आपल्याला मिळावा, अशीच अपेक्षा प्रत्येक आईची-वडिलांची असते. त्यामुळे मी तुझा बाप असलो, वयाने मोठा असलो, तरी तुला एक विनंती करतो. या पुढे काल जसा तू घरी येणार नसल्याचा, पण सुखरूप असल्याचा निरोप तुझ्या पत्नीला दिलास ,तसा कशाही रितीने मोबाईलवर, एसएमएस किंवा ईमेल, जसे तुला सोयीचे असेल तसा मलाही देत जा. म्हणजे मला, तुझ्या या म्हाता-या बापाला, तूझी काळजी वाटणार नाही.” एवढं बोलून मी मोबाईलवरील संभाषण बंद केले.


थोडा वेळ असाच गेला आणि माझा परममित्र, माझ्या मनातील ‘तो’ कोपरा प्रगट झाला व मला प्रश्न करता झाला,
“राजा, आपल्या मुलीने, मुलांने त्यांच्या दिवसभराच्या कामातून फक्त दोन-तीन मिनीटांचा वेळ काढून आपण सुरक्षित, सुखात, समाधानात, आनंदात आहोत, सर्व ठिक आहे, असा निरोप द्यावा अशी अपेक्षा तुझ्याप्रमाणे सर्वच आई-वडिलांची, विशेषतः आपल्या मुलां-मुलींपासून जे दूर आहेत त्यांची असते नाही कां?”

मनातील ‘त्या’ कोप-याने विचारलेल्या प्रश्नाला मान हलवून मी होकार दिला. माझा होकार पाहून माझ्या मनातील ‘त्या’ कोप-याने माझ्या पुढ्यात एक प्रश्न टाकला,

“तर मग राजा मला सांग, तो परमेश्वर. जो तुझा, माझा, आपणा सर्वांचा पिता आहे, ती जगन्माता; जी तुझी, माझी, आपणा सर्वांची आई आहे, तीही आपल्या सर्व मुलां-मुलींकडून सुरक्षित, समाधानात, आनंदात असल्याच्या निरोपाची, संदेशाची अपेक्षा करत असतील, नाही कां?”

मी कांही उत्तर द्यायच्या आधीच माझ्या मनातील ‘तो’ कोपरा पुढे म्हणाला,
“राजा, मी सांगतो हे जर तुला पटत असेल तर आपणा सर्वांना, दररोज सकाळी जाग आल्यावर एक छोटासा संदेश त्या जगतनियंत्याला द्यावा...

हे जगन्माता, हे परमपिता, तुझ्या आशिर्वादामुळे
मला ही आजची सुंदर सकाळ भेटत आहे.
तू खुप अनमोल भेटी मला दिल्या आहेस.
तू मला डोळे दिलेस आणि मी फुलांचे सौंदर्य पाहतो.
तू मला कान दिले आहेस व मला पक्ष्यांची मधुर किलबिल ऐकता येते.
तू दिलेल्या जीभेच्या भेटीमुळे मला चांगल्या पदार्थांचा स्वाद घेता येतो .....
भगवंता, तू मला दिलेल्या भेटी तुझ्याप्रमाणेच अनंत आहेत, त्यांची यादी करणेही माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. पण, मला माहिती आहे त्या फक्त तुझ्याचमुळे आहेत. मी तुझ्यापासून खुप दूर अंतरावर आहे, पण तू दिलेल्या या भेटींच्यामुळे मी आज, सुरक्षित, सुखरूप आहे, सुखी, समाधानी आहे. तू दाखवलेला हा आजचा दिवस आणि तूझ्या अनंत भेटीसाठी तुझे आभार!"

"असा संदेश त्या परमपित्याला, जगन्मातेला पाठविणे अत्यावश्यक नाही कां ?”

प्रश्नांच्या उत्तराची वाट न पाहता माझ्या मनातील ‘तो’ कोपरा आपल्या ठिकाणी परतला. आणि हा संदेश कसा पाठवायचा या विचाराचे जाळे माझे मन विणु लागले.

- आजचे बोल अंतरंगाचे पुर्ण