| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ जुलै २०२४
सांगलीसह चांदोली व कोयना धरण परिसरात पावसाची संततधर कायम असून, वारणा व कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने, वारणा कृष्णा नदीमध्ये सध्या स्थिर असलेली पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, सांगलीसह काही गावातील नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस असून २४ तासांत कोयना धरण येथे १६४, तर नवजा येथे १४५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले; तसेच कोयना धरणातही पाण्याची चांगली आवक आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून एक हजार ५० क्युसेक पाणी सोडले आहे; तसेच वारणा (चांदोली) धरण ८२.५१ टक्के भरले असून मंगळवारी दुपारपासून धरणाचे चार वक्राकार दरवाजे उचलून दोन हजार १५२ क्युसेक तर वीजनिर्मिती केंद्रातून एक हजार ६४८ कयुसेक असा एकूण तीन हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
यामुळे 'वारणा', 'कृष्णा' नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. सांगली आर्यविन येथे कृष्णेची पाणीपातळी २७ फुटांना स्थिर आहे.
कृष्णा नदीची आजची पाणी स्थिती
पाणीपातळी फूट इंचामध्ये
कृष्णा पूल कराड - १४.८
बहे पूल - ९
ताकारी पूल - २७
भिलवडी पूल - २८.४
आर्यविन - २७
राजापूर बंधारा - ४१.५
राजाराम बंधारा - ४०.८
जिल्ह्यात १२.१ मिलिमीटर पाऊस
जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १२.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज १२.१ (३५५), जत २ (२५७.८), खानापूर ८.९ (२८५.१), वाळवा १७.३ (५३५.७), तासगाव ८.९ (३५०.१), शिराळा ३१ (७५३.१), आटपाडी १.४ (२२९.७), कवठेमहांकाळ ४.७ (३४४.७), पलूस १३.४ (३७१.५), कडेगाव १५.५ (३६०.५).
धरणातील पाणीसाठा
धरण - आज पाणीसाठा - एकूण पाणीसाठा
कोयना - ६४.५५ - १०५.२५
धोम - ६.६३ - १३.५०
कन्हेर - ६.११ - १०.१०
वारणा - २८.१५ - ३४.४०
दूधगंगा - १६.७२ - २५.४०
राधानगरी - ७.३६ - ८.३६
तुळशी - २.६२ - ३.४७
कासारी - २.०४ - २.७७
पाटगाव - ३.२६ - ३.७२
धोम-बलकवडी - २.०३ - ४.०८
उरमोडी - ४.१० - ९.९७
तारळी - ३.४२ - ५.८५
अलमट्टी - ९१.८३ - १२३.०८