Sangli Samachar

The Janshakti News

केवळ दैव बलवत्तर म्हणून कोसळलेल्या छपराखाली सापडूनही दोन बालिकांचे वाचले प्राण !



| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. २९ जुलै २०२४
आयुष्याची दोरी बळकट असेल तर, कितीही मोठे प्राणघातक संकट आले तरी त्यातून एखाद्या व्यक्तीची सुटका झाल्याचे अनेक प्रसंग आपण वृत्तपत्रातून वाचतो, टीव्हीवर पाहतो. आणि आपल्या तोंडातून आपसूक शब्द निघतात, "केवळ दैव बलवत्तर म्हणून"...

कोसळदार पावसामुळे केवळ नद्यांनाच पूर आले आहेत असे नव्हे, तर गावागावात पाण्याची तळी साठलेले दिसतात. अनेक घरांवरही पावसाच्या पाण्याने मुक्काम ठोकलेला दिसतो. परंतु या साचलेल्या पाण्यामुळे घरांना, विशेषतः जुन्या घरांना धोका असतो. म्हणून पावसाळापूर्वी अशा जुन्या घरांचे डागडुजी ही केली जाते. यातूनही एखादी मोठे दुर्घटना घडते आणि अनेकांना जीवास मुकावे लागते, तर काहींना कायमचे अपंगत्व घेऊन उर्वरित आयुष्य कंठावे लागते...

असाच अनुभव नुकताच तासगाव तालुक्यातील हातनुर ग्रामस्थांना आला. हातनुर येथील सरकार वाड्यात दिवंगत स्वातंत्र्य सेनानी हरिभाऊ खुजट यांचा पूर्वीच्या काळातील माळवदी वाडा आहे. या वाड्यात सध्या त्यांच्या कुटुंबातील चैतन्य चंद्रकांत खुजट हे राहतात. गुरुवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान त्यांच्या भूमी (वय ६) व शुभ्रा (वय ३) या दोन्ही मुली वाड्यातील खोलीत अभ्यास करीत बसल्या होत्या. कोसळदार पावसामुळे भिजलेले माळवदी छत अचानक दोघींच्या अंगावर कोसळले. या दुर्घटनेत त्या मातीच्या घरात या दोन्ही मुले काढल्या गेल्या.

मोठा आवाज आल्यामुळे दुसऱ्या खोलीत स्वयंपाक करीत असलेली त्यांची आई अनुजा व शेजारच्या घरातील लोक जीवाच्या आकांताने त्या भागाकडे धावले ढगाराखाली मुली सापडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. याचवेळी विद्युत पुरवठाही खंडित झाला. परंतु अंधार व मुसळधार पाऊस यांची तमा न बाळगता अवघ्या दहा मिनिटात मुलींच्या अंगावरील मातीचा ढिगारा हटवून परिसरातील युवकांनी या दोन्ही छकुल्यांना एक प्रकारे जीवदानच दिले.


अडकलेल्या दोन्ही मुलींचे श्वास गुदमरल्याने त्यांच्यावर तातडीने तासगाव येथील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. सध्या दोन्ही मुलींची प्रकृती स्थिर असून, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विशाल कारंडे यांनी जखमी मुलींची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली आणि कुटुंबीयांना धीर दिला.

या मदत कार्यात योगेश खुजट, दीपक जमदाडे, किशोर पाटील, प्रतीक पाटील, रोहन पाटील, पोपट पाटील व शुभम पाटील या युवकांनी मोठे धैर्य दाखवून ग्रामस्थांच्या मदतीने हे कार्य केले. दरम्यान तलाठी संतोष शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घरातील मोडतोड झालेल्या साहित्यासह कपडे पुस्तके कपाट आदींचे सुमारे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास अधिकारी जालिंदर मोहिते यांनी तातडीने गावातील अन्य घरांचे हे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिले आहेत.