Sangli Samachar

The Janshakti News

चविष्ट, स्वादिष्ट, चमचमीत सांगली !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जुलै २०२४
प्रत्येक गावातील खाद्यपदार्थांची एक विशिष्ट चव असते. जसे कोल्हापूर म्हणले की तिखटजाळ चव ! सांगली त मात्र चविष्ट, स्वादिष्ट, चमचमीत खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. नाष्ट्यासाठी पोहे, उप्पीट, शिरा, इडली, उडीद वडा, डोसा, ढोकळा, कचोरी असे पदार्थ, शाकाहारी भोजनाच्या खानावळी, मांसाहारी जेवणाची अनेक ठिकाणे, बिर्याणी, बॉईल अंडा फ्राय, अंडा वडा, भेळ, पाणीपुरी, पावभाजी, लस्सी, आईस्क्रीम असे चविष्ट, स्वादिष्ट, चमचमीत पदार्थ मिळणारी भरपूर ठिकाणे इथे तुम्हाला पदोपदी भेटतील.

प्रत्येकाच्या आवडी निवडीसाठी असंख्य पर्याय आपल्याला खुणावत असतात. यातील बऱ्याच ठिकाणांचा आस्वाद मी स्वत: घेतला आहे तर काही ठिकाणांची माहिती ऐकीव आहे. अशा काही ठिकाणांचा आढावा घेण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे. यातील काही ठिकाणे आजही दिमाखात चालू आहेत तर काही ठिकाणे बंद झाली आहेत. काही नवीन ठिकाणे चालू झाली असतील.
सांगलीच्या खाद्यभ्रमंतीची सुरवात पहाटे ३.३० ला स्टॅण्ड वर मिळणाऱ्या गरमागरम पोह्याने होते. आमच्या लहानपणी आनंद टॉकीज च्या बाजूला पाच पैशाला पांगळ्याची भजी मिळायची. त्यानंतर मारूती चौकात पंधरा पैशाला मिळणारी भजी फेमस होती. तसेच चेंबर ऑफ कॉमर्स च्या बाजूला मिळणारी भजी देखील चांगली असायची. हळद भवन मधील पोह्याबरोबर मिळणारा कट प्रसिद्ध होता. गणेश टाकीखाली मिळणाऱ्या पोह्याला जगात कुठेही तोड नाही याबाबत कोणत्याही खवय्याचे दुमत असणार नाही. 


मिसळ हा आपला वीक पॉइंट . अनेक ठिकाणी वेगवेगळ्या चवीची मिसळ चाखायला मिळाली . याची सुरुवात कॉलेजच्या पहिल्या वर्षी तिखटजाळ कट वड्याने झाली . गरमागरम , तेलाचा मोहवणारा तवंग , त्यात घातलेला मध्यम आकाराचा बटाटा वडा , त्यावर पसरलेल्या बारीक चिरलेल्या कांद्याचा थर बघून पोटात भूक उसळायला लागायची . वेटरने प्लेट टेबलावर ठेवताना नाकात शिरलेल्या वासाने दम निघायचा नाही . पहिल्यांदा कांदा बाजूला सारून तोंड भाजत असताना चमच्याने प्यायलेला कट घशातून खाली उतरताना मिळणाऱ्या आनंदाची तुलना करणे अवघडच . त्यानंतर कट वडा भक्षण करताना जी हालत व्हायची ती विचारू नका . त्यावर बिन दुधाचा गरम चहा पिण्यात एक प्रकारचे थ्रील वाटायचे . अर्थात आर्थिक परिस्थितीमुळे हे दरवेळी शक्य व्हायचे नाही . पण त्याची ओढ मात्र कायम असायची . 

नंतर मिसळीने जीवनात प्रवेश केल्यावर मात्र कट वडा मागे पडला . आनंद टॉकीज समोरच्या हॉटेलातील तिखट मिसळ खूप फेमस होती . तेथील रस्सा उर्फ कट मला आवडायचा . तसं सांगलीत बर्‍याच ठिकाणी मिसळ मिळायची . थोड्याफार फरकाने सगळ्यांची चव एकसारखी असायची . मिसळीवरील प्रेमापोटी आम्ही जमेल तसा आनंद घ्यायचो . एका ठिकाणचा उल्लेख मात्र अपरिहार्य आहे . मोठ्या मंडईच्या मागील भागातील धान्य बाजाराच्या सुरवातीला दिवसभर इतर पदार्थ , दुपारी व रात्री व्हेज , नॉन व्हेज जेवण असे एक हॉटेल होते . तेथे सकाळी गेल्यावर खास मिसळ मिळायची . त्यामध्ये फरसाण वगैरे इतर पदार्था बरोबर जो कट मिळायचा तो म्हणजे काल शिल्लक राहिलेला मटणाचा रस्सा असायचा . दिवसभर रटरटलेल्या त्या रश्याची आठवण जरी आली तरी तोंडाला पाणी सुटतं .
आम्ही कॉलेजला असताना सदासुख जवळील हॉटेलात मिळणारी आंबोळी , कढी वडा खूप फेमस होता . मारूती रोडवरील एका हॉटेलातील मिसळ , साबुदाणा वडा छान असायचा . पेशवाई संतोषची उपवासाची मिसळ , जुन्या स्टेशन चौकातील मसाला डोसा , काँग्रेस कमिटी समोरील सँडविच ही काही आवडीची ठिकाणे होती . आनंद चौकात अलीच्या गाड्यावर मिळणारे मटण देखील काही काळ फेमस होते . चव काही फार चांगली नसायची , पण रात्री उशिरापर्यंत जेवण मिळायचे म्हणून लोक तेथे उभे राहून जेवायचे . रात्री भटकंती करताना पटेल चौकातील भजी , नंतर आनंद समोरील दौलूमामाचा चहा हमखास व्हायचा . 


बालाजी चौकातील दुधाच्या गाड्यावर मिळणारी भरपूर साखर घातलेली दुधाची एक प्लेट जाड साय मला आवडायची . स्टेशन समोरच्या गल्लीत असणारे उत्तम घरगुती पद्धतीचे शाकाहारी जेवण मिळणारे हॉटेल सगळ्यात जास्त प्रसिद्ध होते . नंतर काँग्रेस कमिटीच्या अलिकडे सगळ्यात मोठे शाकाहारी हॉटेल निघाले . तेथे बहुतेक सगळे पदार्थ मिळायचे . तेथे फॅमिली व जेवणासाठी तळघरात स्वतंत्र व्यवस्था होती . एकदा मी तेथे सिझलर मागविले . त्यावेळी हा पदार्थ बर्‍याच जणांना माहीत नव्हता . सिझलरच्या धुराने , वासाने सगळं हॉटेल आमच्याकडे आम्ही काय मागवलं म्हणून पहात होतं . आमची कॉलर आपसूकच ताठ झाली . आजदेखील ते हॉटेल जोरात चालू आहे . 

सांगलीच्या एस टी स्टॅन्ड च्या बाहेर पहाटे साडेतीन , चारपासून एका गाड्यावर गरमागरम पोहे मिळायचे . रात्री उशिरापर्यंत गप्पा मारल्यावर ते पोहे खाण्यासाठी आम्ही जागे रहायचो . जुन्या स्टेशन चौकात फक्त रात्री एका गाड्यावर अंडा वडा मिळायचा . तसेच स्टॅन्ड च्या बाहेर एका गाड्यावर बॉईल एग बुर्जी मिळायची . वखारभाग, प्रतापसिंह उद्याना बाहेर मिळणारी ओली, सुखी भेळ, पाणीपुरी, दही वडा यासारख्या खाद्यपदार्थांनी असंख्याना भुरळ घातली आहे. वखारभागातील प्रसिद्ध भेळेच्या बाजूला मिळणारी पावभाजी अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. 
 सांगलीमध्ये जेवायला जाण्याची ठिकाणे बरीच होती व आहेत . त्यावेळी सहकुटुंब नॉन व्हेज जेवायला जाण्यासारखे एकमेव ठिकाण म्हणजे मार्केट यार्डच्या गेट शेजारचे हॉटेल होते. चांदणी चौकात एकदम घरगुती मटणाची सोय नव्याने झाल्याचे कळल्याने मी व मित्र तेथे गेलो. त्याचा मालक जैन तर त्याची पत्नी मुस्लिम जी खास आपल्या पद्धतीचे जेवण करायची. एका खोलीत गोल टेबल, त्याच्या भोवती सात, आठ स्टूल्स ठेवलेली. चव वेगळी, पण बरी होती. हळु हळु हे ठिकाण चांगलेच फेमस झाले . जेवायचा नंबर येण्यासाठी खूप वाट पहावी लागायची. पण क्वालिटी मेन्टेन करण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे गर्दी कमी कमी होत गेली. 

सिव्हिल हॉस्पिटल शेजारी तळघरात आमच्या एका मित्राने हॉटेल चालू केले. चव बरी असायची. तेथे मिळणारा पांढरा रस्सा खूप पॉप्युलर होता. मिरजेला स्टेशन रोडवर एका मुस्लिम माणसाने माडीवर हॉटेल चालू केले . वेगळ्या चवीने ते बराच काळ चांगले चालले.
आनंदच्या मागे असणारे हॉटेल मटणासाठी खूप फेमस होते. 

मंडईतील हॉटेलात मित्र घेऊन गेला. ते गुजराथी, मारवाडी तसेच अनेक व्यापाऱ्यांचे खूप आवडते ठिकाण होते म. चव सोसोच, पण व्यापारी वस्तीत असल्याने आणि मटण दिवसभर कधीही मिळत असल्यामुळे खूप जोरात चालायचे . क्वांटिटी म्हणजे देवाला नैवेद्य दाखवतात तेवढीच. 

सांगलीत मार्टीन्स नावाचे अत्याधुनिक पॉश हॉटेल चालू झाले. सिनेमात असायचे तसे मंद लाईट्स, दर्जेदार फर्निचर, स्वच्छ, कडक इस्त्रीचे कपडे घातलेले आदबशीर वेटर्स, पार्श्वभूमीवर संगीत असा थाट होता. येथे जाणे हा त्या काळातील तरुणाईचा स्टेटस सिम्बॉल होता. अगोदर वर्णन केलेल्या ठिकाणांचे स्वरूप खानावळीसारखे होते. पण मार्टीन्स ची शान काही वेगळीच होती. खाण्यापेक्षा इथे पिणे , गप्पा, मोठी स्वप्ने पहात निवांत घालवलेला वेळ याला जास्त महत्व होतं. बरीच वर्षे छान चाललेले हॉटेल अचानक बंद झाले. 

नंतर सांगलीत बरीच चांगली हॉटेलं झाली. जी खवैय्या आवडनिवड जपणारी. आता तर म्हणे सांगलीत दर महिन्याला एक ऑफीस हॉटेल निघतंय... पण. जितक्या जोमाने त्याची प्रसिद्धी होते, गर्दी होते, तितक्याच लवकर ते बंदही होते. यामागची कारणे ज्याची त्यांनी शोधावीत.

- शिरीष माणगावकर 
(८६९१९६४१२१)