Sangli Samachar

The Janshakti News

मला मिळालेले सत्पात्री (?) दान ! (✒️ राजा सांगलीकर)





| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरु - दि. ६ जुलै २०२४
“साहेब, कृपया एक-दोन मिनीटे थांबाल कां? तुमच्याशी कांही बोलायचे आहे.”

एका संध्याकाळी ऑफीसमधून घरी परततांना माझ्या कानांवर शब्द आले. आवाजाच्या दिशने मी पाहिले. चाळीशीच्या आसपास वयाचा एक पुरूष, त्याच्यामागे उभी एक स्त्री, दोन छोटी मुले, कपडे मळलेले, डोक्याला बुक्का-गंध माळलेला. मी थांबलो आणि प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहु लागलो.

मी थांबलेला पाहून ते सारेजण माझ्याजवळ आले. डोळ्यात पाणी आणून तो पुरूष व ती स्त्री बोलू लागली,

“साहेब, आम्ही चांगल्या घरातील लोक. भिकारी नाही. पंढरपुरला पांडुरंगाचे दर्शन घेऊन घरी परत चाललो होतो, पण वाटेत सर्व सामानाची, पैशाची चोरी झाली. इथे आमच्या ओळखीचे कोणी नाही. घरी परत जायचे आहे पण तिकीटासाठी पैसे नाहीत. आपण कांही मदत केलीत तर फार उपकार होतील. नाही म्हणू नका साहेब. फार उपकार होतील तुमचे”


ती दोघे डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी थांबले.
कांही दिवसांपुर्वी भीक मागण्याच्या या नव्या पद्धतीबद्दल वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी मला आठवली. मी सावध झालो. देव, भक्ति यांची बेमालूम जोडणी देत लोकांना कणव येईल अशा खोट्या कथा रचून भीक मागणा-या; खरं तर; फसवणा-या लोकांचा मला राग आला. तरीही शांतपणे मी त्यांना म्हणालो, ‘माफ करा. मी कांही मदत करू शकत नाही तुम्हाला’ आणि तेथून मी सटकलो.

थोड्या वेळाने माझ्या मनातील नेहमीच्या ‘त्या’ कोप-यातून आवाज आला,

“राजा, त्या गरजूंना तू कां बरं मदत केली नाहीस?”

“मी त्यांना मदत केली नाही कारण, हे लोक कांहीतरी खोट्या-नाट्या कथा सांगून लोकांच्या भावनेला हात घालतात. त्यांना फसवून पैसे उकळतात आणि कष्ट न करता फुकट मिळालेल्या पैशातुन दारू पितात, जुगार खेळतात, चैनी करतात. आम्ही कष्टाने मिळवलेल्या पैशाचा गैरवापर करतात. दान केले पाहिजे हे मला मान्य आहे, पण ते सत्पात्री असायला पाहिजे नाही कां?” मी उत्तरलो.

“राजा, त्या व्यक्तिला मदत न करण्याचा तुझा निर्णय योग्य कि अयोग्य यावर मला कांही भाष्य करायचे नाही. दान सत्पात्री असावे, म्हणजे ज्या कारणासाठी दान मिळाले त्या कारणासाठीच त्या दानाचा विनीयोग दान मिळालेल्या व्यक्तिने करावा, दानाचा गैरवापर करू नये हा सत्य नियम आहे. पण हा नियम तुझ्या बाबतीतही लागू आहे, असावा असे तूला नाही कां वाटत?”


माझ्या मनातील ‘तो’ कोपरा नेहमीप्रमाणे कोड्यामध्ये बोलला. थोड्याशा रागातच मी मनातील ‘त्या’ कोप-याला फटकारले, 

“काय म्हणायचे आहे तुला ? स्पष्ट बोल. मी कुठे भीक मागायला गेलो आहे ? असे माझ्या जवळ काय आहे जे मला दानात मिळाले आहे ? आणि त्या तथाकथित दानाचा मी कशारितीने गैरवापर करत आहे? नेहमी कांहीतरी उलट-सुलट बडबडायचे झाले.”

“राजा, रागावू नकोस, विचार कर. हे मानवी जीवन, या क्षणाला तू घेत असलेला हा श्वास, हे निरोगी शरीर, धडधाकट हात, पाय, डोऴे, ..... हे सारे, तू कष्ट करून मिळवले आहेस की, परमेश्वरांने तुला दिलेले दान आहे? आणि हे जर तुला मिळालेले दान आहे तर ते तुला कशासाठी दिले आहे ?"

थोडा वेळ थांबून 'त्या' कोपऱ्याने माझा कानोसा घेतला आणि पुढे म्हटले.

"प्रत्येक निर्मितीमागे कोणते ना कोणते कारण असते. परमेश्वराने मानवाची निर्मिती करण्यामागे कोणते कारण असावे ? तुला प्रदान केलेल्या या मानवी जीवनाचा, या शरीराचा, विनीयोग तू कशासाठी, कोणत्या कारणासाठी करावास असे त्या परमात्म्याला वाटते ? मानवी जन्माचा उद्देश आपल्यातील ‘स्व’ कडे लक्ष देणे, त्याला ओळखणे तूला समजला आहे कां ? त्या दयावंताकडून हे दान ज्या कारणासाठी तुला मिळाले आहे, त्या कारणासाठीच ते तू वापरत आहेस कां? विचार कर. शांत चित्ताने विचार कर व आठव. आजवरचे तुझे जीवन, चांगली-वाईट वर्तणुक, सवयी आणि तूच ठरव तुला मिळालेल्या या अमूल्य दानास तू पात्र आहेस कां?” 

प्रश्नांची भेंडोळी माझ्यापुढे सोडून माझ्या मनातील ‘तो’ कोपरा अदृश्य झाला. माझ्या डोळ्यांसमोरून माझ्या गत जीवनाचा पडदा झरझर सरकु लागला. घशाला कोरड पडली, हातापायांना कंप सुटला. मनात विचार आला. 

‘हे मानवी जीवन, हे शरीर त्या कृपावंताचे मंदिर. त्यामध्ये दयेची, कृपेची, मायेची, प्रेमाची, करूणेची, ममतेची, माणुसकीची मूर्ती स्थापन करून, जीवनातील आनंद मिळवण्यासाठी व मिळालेला आनंद सर्वांमध्ये वाटण्यासाठी मला त्या परमप्रभुने दिले. पण मी ?..... 

पण मी, या मंदिरात संपत्तीचा, ज्ञानाचा, पदाचा, जातीचा, बळाचा.... वृथा अभिमान, अहंकार जोपासला. आप्पलपोटीपणाने, स्वार्थाने, द्वेषांने, निष्ठूरतने इतरांच्या भावनां, याचना, विनवण्या पायदळी तुडवल्या. त्या परमदयाळू, कृपाळू जगत्जननीची, जगन्नायकाची प्रतिमा हृदयात स्थापण करण्याऐवजी काम, क्रोध, लोभरूपी षड्रिपुंची ‘रावणा’ची मूर्ती स्थापण केली.

परिणामी मी स्वतः दुःखी झालोच, पण इतरांनाही दुःखी केले. परमकृपेने, भाग्याने मला दान मिळालेले हे अमूल्य मानवी जीवन, हे माझे शरीर या दानामागील विचारांना मी विसरल्याने व्यर्थ गेल्याच्या भावनेने माझे मन होरपळून निघू लागले. अरेरे, जीवनाच्या या संध्याकाळी आता मी करू तरी काय? काय करू म्हणजे माझ्या या जीवनाचे कांहीतरी सार्थक होईल?’ 

माझ्या मनात विचारांचा हलकल्लोळ माजला. मी हळहळत, विचार करत असतांना परत एकवेळ माझ्या मनातील ‘तो’ कोपरा अवतीर्ण झाला व म्हणाला, 

“राजा, मानवी जीवनाचा खरा अर्थ समजावून घ्यायला तूला उशीर झाला आहे हे खरे, पण अजूनही वेळ गेलेली नाही. महान व्यक्तिनीं मानवी जीवनाचा उद्देश सांगितला आहे: प्रेमभावना जोपासणे -१, इतरांना मदत करणे, मदत करता येत नसेल तर किमान हानी, इजा न पोहचविणे -२, आणि मानवी जीवनाला देवत्वाच्या पातळीवर उंचावण्याच्या आदर्शाला पाळण्याचा प्रयत्न करून दररोज आनंद प्राप्त करणे -३’."

"राजा, मानवी जीवनाच्या या उद्देशाला नेहमी स्मरणात ठेव. आजवर झालेल्या चुका लक्षात घे आणि त्यांना टाळून उर्वरित जीवन जग. आपल्या विचारांनी, वागण्याने, स्वतः आनंदी, समाधानी हो व इतरांना आनंद, सुख-समाधान दे आणि सिद्ध कर: परमेश्वराने तूला दिलेले हे दान सत्पात्री आहे.” 

माझ्या मनातील ‘तो’ कोपरा परत एक वेळ जसा आला होता तसा निघून गेला. आणि आता या क्षणांपासून तरी मला मिळालेले परमेश्वरी दान हे सत्पात्री आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण जगायचे असा ठाम निश्चय मी मनात केला. 
 
- आजचे बोल-अंतरंगाचे पूर्ण
संदर्भः १. भ. रामकृष्ण परमहंस, २. दलाई लामा, ३. जॉन ऐ. विट्सो