yuva MAharashtra सांगली जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा प्रवेश, आरोग्य विभाग सतर्क !

सांगली जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचा प्रवेश, आरोग्य विभाग सतर्क !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ जुलै २०२४
मध्यंतरी थैमान घातलेल्या स्वाइन फ्लू या आजाराने पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यात प्रवेश केला असून मिरज तालुक्यातील एका गावात दीड वर्षाच्या बालकाला स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाला काल प्राप्त झाला. आणि एकच खळबळ माजली. सध्या या बालकावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बालकास ताप आल्यामुळे 28 जून रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर हे ताप न उतरल्याने डेंग्य, स्वाईन फ्लू सह अन्य काही आजारांच्या चाचण्या करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता त्यानुसार करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाल्यानंतर सदर बालकास स्वाइन फ्लू झाल्याचे लक्षात आले. परंतु सध्या या बालकाचे प्रकृती उत्तम असून एक दोन दिवसात त्याला घरी सोडण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.


ज्या बालकाला स्वाइन फ्लू झाला आहे त्याच्या घराच्या आसपास सोमवारी तातडीने सर्वेक्षण करण्यात आले. मात्र अन्य कोणत्याही व्यक्तीमध्ये स्वाईन फ्लूची लक्षणे आढळून आली नाहीत. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून सदर बालकाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना स्वाइन फ्लूच्या अनुषंगाने प्राथमिक उपचार सुरू केले आहेत. या घटनेमुळे कोणीही घाबरू नये मात्र लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

याबाबत बोलताना जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ म्हणाले की गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध जिल्ह्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडत आहेत. मात्र पर्यंत या स्वाइन फ्लू चा एकही रुग्ण आढळलेला नव्हता.

मिरज पूर्व भागातील ज्या बालकाला स्वाईन फ्लू ची लागण झाली आहे, त्याची प्रकृती उत्तम आहे. सदर गावातील अथवा आसपासच्या गावातील नागरिकांना स्वाइन फ्लू ची लक्षणे दिसल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात चाचणी करण्यात यावे असा सल्लाही डॉक्टर विजयकुमार बाग यांनी दिला आहे.