| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ जुलै २०२४
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारानी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशना नुसार नियमाचे काटेकोर पालन केलेच पाहिजे. स्कूलबस चालकांनी निष्काळजीपणा केल्यास
कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज येथे दिला.
पोलीस मुख्यालयात विद्यार्थी वाहतूकविषयी परिवहन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी संदीप घुगे यांनी वाहतूकदारांना या सूचना दिल्या आहेत. शाळांमध्ये परिवहन समिती तातडीने स्थापन करण्याच्या सूचनाही या बैठकीत त्यांनी दिल्या.
विद्यार्थ्यांची सुरक्षा हे महत्त्वाचे असल्याचे अधीक्षक घुगे यांनी ठणकावून सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नियमांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे. सीसीटीव्ही, जीपीएस, आग प्रतिबंधक यंत्रणेसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही यामध्ये वापर केला गेला पाहिजे. याशिवाय मुला मुलींची छेडछाड होणार नाही, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे. तसेच चालक, मदतनीस यांचे पोलीस विभागाकडून चारित्र्य पडताळणी होणे गरजेचे आहे. ने- आण करणारी नोंद वही प्रत्येकाने ठेवलीच पाहिजे. याशिवाय प्रत्येक शाळेत परिवहन समिती असणे आवश्यक आहे.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे साळी याने नियमांची माहिती दिली. या बैठकीसाठी शिक्षक, शाळा प्रतिनिधी, रिक्षाचालक, वाहनचालक, बस चालक यांनी काही सूचना मांडल्या. निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी शेवटी आभार मानले.