| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरू - दि. १८ जुलै २०२४
बालपणापासुनचे माझे एक स्नेही श्री. जयप्रकाश कदम, सांगली, यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक चारोळी प्रसिद्ध केली होती.
पूजा अर्चा केल्याने समाधान मिळते,
पुण्य कर्म करता पाप पण जळते,
जर हे खरे असेल तर मग का हो,
मन सारखे मद्यालयाकडे वळते?
मी ही चारोळी वाचली आणि माझ्या मनात दोन प्रश्न घोंघाऊ लागले. मी चांगली व वाईट अशी दोन्ही कृत्य, व्यवहार करतो, त्यामागे कोणते कारण असावे?
एकाद्या कृतीतून माझ्या मनाला समाधान, आनंद मिळाला तरी, आनंद, सुख मिळवण्यासाठी मी नेहमी नवनवीन दरवाजे कां धुंडाळत असतो?
उत्तरादाखल अनेक कारणे मला सामोरी आली. पण एकही कारण माझ्या मनाला पटेना. अनुत्तरीत प्रश्नांच्या उत्तरावर विचार करत असतांना माझ्या मनातील ‘त्या’ कोप-यातून आवाज आला,
“राजा, गरजेशिवाय कोणतेही कृत्य घडत नाही आणि प्रत्येक कृतीमागे कांही ना कांही उद्देश असतो, कारण असते. दैनंदिन जीवनात आपण करत असलेल्या कोणत्याही कृतीमागे मग ती कृती चांगली असो कि वाईट असो, पाप कर्म असो कि पुण्य कर्म असो, दारू पिणे असो कि दूध पिणे असो, किंवा दुस-याची निंदा करणे, दुखापत करणे, हत्या करणे यासारखी अत्यंत चुकीची कृतीही असो, या सर्व कृतींच्या मागे वरवर दिसणारी वेगवेगळी हजारो कारणे असली तरी, त्यामागे मूळ कारण फक्त एक आणि एकच असते. आणि ते म्हणजे शारीरिक, मानसिक दुःखातुन, वेदनातून स्वतःची सुटका करून घेणे, त्यांना टाळणे व सुखाची, समाधानाची, आनंदाची प्राप्ती करणे, करून घेणे.”-१
मनातील ‘त्या’ कोप-याने दिलेल्या स्पष्टीकरणातून माझ्या पहिल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मला मिळाले. पण दुसरा प्रश्न मनाला समाधान, आनंद देणारी कृती करत असतांना मी सतत इतर अन्य कृतींचा शोध कां घेत असतो; अनुत्तरीतच राहिला.
माझ्या मनातील ‘त्या’ कोप-याला मी म्हणालो,
“आपली सर्व धडपड; कृती सुख, समाधान, आनंद मिळवण्यासाठी असतात हे मला पटले. पण एखाद्या कृतीतून आनंद, समाधान मिळते हे समजल्यानंतर त्याला सोडून किंवा ती करत असतांनाही आपले मन अन्य क्रिया-कृत्याकडे कां वळते, वारंवार नित्य नव्याचा शोध कां घेत राहते?”
“राजा, याचे कारण आनंदाचा शोध कुठे व कसा घ्यायचा या बाबतचे आपले अज्ञान. मला काय सांगायचे आहे हे समजण्यासाठी तुला मी एक गोष्ट सांगतो. लक्षपूर्वक ऐक.” मनातील ‘तो’ कोपरा गोष्ट सांगू लागला.
तुझं आहे तूजपाशी ....
रुबिया नांवाची एक वृद्ध विद्वान सुफी संत महिला होती. गांवातील सर्वांना तिच्याबदद्ल आदर होता. एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास लोकांनी रुबियाला तिच्या झोपडी समोरील रस्त्यावर कांहीतरी शोधतांना पाहिले. या वृद्ध, विद्वान महिलेला तिचे जे कांही हरवले आहे ते शोधायला मदत करावी या विचाराने लोकांनी तिला विचारले,
“काय शोधत आहात?”
रुबियाने सांगितले, “माझी सुई हरवली आहे ती मी शोधत आहे.”
रूबियाच्या सोबत ते लोकही रुबियाची हरवलेली सुई रस्त्यावर शोधु लागले. सर्वांनी रस्त्याचा कोपरा नी कोपरा शोधला, पण हरवलेली सुई कांही सापडली नाही. आता थोड्या वेळाने सूर्य मावळला कि अंधार होणार व अंधारात सुई शोधणे कठिण होणार, हे जाणून त्यातील कांही लोकांनी रुबियाला विचारले,
“आता थोड्याच वेळात अंधार पडेल. एवढ्या मोठ्या रस्त्यावर सुईसारखी लहान वस्तु शोधूनही सापडणार नाही, त्यापेक्षा तुम्ही सुई कुठे हरवली, ती जागा दाखवलीत तर असलेल्या उजेडामध्ये ती शोधली तर सापडेल.”
त्यावर रुबिया म्हणाली, “मी झोपडीमध्ये शिवणकाम करत बसले होते, तिथे आत झोपडीमध्ये माझी सुई हरवली.”
रुबियाचे उत्तर ऐकून तिथे जमलेल्या लोकांनी कांहीशा आश्चर्यचकित रोषाने तिला विचारले,
“सुई आत झोपडीमध्ये हरवली आहे तर, ती जिथे हरवली तिथे शोधायचे सोडून इथे बाहेर कशासाठी शोधत आहात?”
रुबियाने सांगितले, “अरे बाबांनो, झोपडीमध्ये अंधार आहे. इथे बाहेर उजेड आहे. बाहेरच्या उजेडामध्ये हरवलेली सुई शोधली की ती सापडेल, या विचाराने मी ती इथे बाहेर शोधत आहे.”
रुबियाचे उत्तर ऐकून लोक हसू लागले, म्हणाले, “काय हा वेडेपणा, अरे जी वस्तु जिथे हरवली तिथे ती न शोधता, ती जिथे मुळातच नाही तिथे शोधून ती कधीतरी मिळेल का?”
लोकांचे उत्तर ऐकून रूबिया लोकांच्यापेक्षाही मोठ्याने जोरजोरात हसू लागली व म्हणाली,
“बाळांनो, मी फक्त तुमच्या वागण्याचे अनुकरण करत आहे. तुम्ही नाही कां सुख, आनंद, समाधान जे तुमच्या मनात आहे, तिथे त्याला शोधायचे सोडून बाहेर जिथे ते नाही तिथे त्याला शोधत?”
मझ्या मनातील कोप-याने रूबीयाची कथा संपवली व ‘तो’ म्हणाला,
“राजा, आनंद, सुख, समाधान मिळवण्यासाठी आपण कांहीना कांही कृती करत असतो. सुरवातीला अशा कृतीतून आपल्याला सुख, समाधान, आनंद मिळतही असतो. परंतु हा मिळालेला आनंद लवकरच नष्ट होतो कारण, आनंद त्या कृतीमध्ये नसतो तर तो असतो आपल्या अंतरंगात.
खरं तर आपल्याला हे समजत नाही, समजले तरी उमजत नाही. त्यामुळे सुखासाठी लालचावलेले, ओढावलेले आपले मन आपल्याला कधी पुण्यकर्म, तर कधी पापकर्म, कधी चांगले कृत्य तर कधी वाईट कृत्य, कधी दुग्धपान तर कधी मद्यपान यासारख्या परस्परविरूद्ध कृती करण्यास आपल्याला भाग पाडत असते.”
माझ्या मनात उठलेल्या प्रश्नांचे समर्पक उत्तर देऊन मनातील ‘तो’ कोपरा आपल्या जागी परतला. आणि मला कळून चुकले,
ओढाळ मन माझे, नाही त्यास बंधन कशाचे ।
सदा हव्यास एक, सुख हवे मज सुख हवे
करी कधी पुण्य कर्म तर पाप कर्म कधी ।
सेवन करी दुधाचे तर मर्कट चाखी मद्यही कधी ।
निमीत्ते आहेत ही सारी, शोध सुखाचा खरे कारण ।
ओढाळ, ओढाळ आहे हे माझे चंचल मन ।।
- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण...
संदर्भः १. 'The Science of Religion', YSS of India, Ranchi (Jharkhand), publication- श्री श्री परमहंस योगानंदांच्या अमेरिकेतील भाषणातील उतारा.