| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जुलै २०२४
येथील खणभागामधील तनिष फोटो स्टुडिओमध्ये घुसून अज्ञात चोरट्याने १ लाख ६६ हजार रुपये किंमतीचा कॅमेरा आणि लेन्स चोरून पोबारा केला. याबाबत तनिष विनोद घाईल (रा. सरकारी दवाखान्याच्या शेजारी, माने गल्ली, बुधगाव, ता. मिरज) यांनी सांगली शहर पोलीसात फिर्याद नोंदविली आहे. ही घटना गुरुवार दि. २७ रोजी रात्री ९.२० ते ९.३० या अवघ्या दहा मिनिटाच्या काळात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील खणभागामधील धनगर गल्लीत नवभारत चौक येथेफिर्यादी तनिष घाईल यांचा फोटो स्टुडिओ आहे. गुरुवारी ते नेहमीप्रमाणे स्टुडिओमध्ये होते. रात्री ९.२० च्या सुमारास फ्रेश होण्यासाठी स्टुडिओचा दरवाजा उघडा ठेवून ते स्वच्छतागृहात गेले होते. अगोदरपासून पाळतीवर असणाऱ्या चोरट्याने तेवढ्यात स्टुडिओमध्ये घुसून आतील महागडा कॅमेरा आणि लेन्स लंपास केले.
दहा मिनिटांनी फिर्यादी तनिष घाईल परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने परिसरात शोधाशोध केली परंतु तेथे कोणीच न आढळल्याने त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास सुरू केला आहे.