yuva MAharashtra अलमट्टी 81 टक्के भरले, प्रमाणाबाहेर पाणी साठा केला तर जलबुडी आंदोलनाचा इशारा !

अलमट्टी 81 टक्के भरले, प्रमाणाबाहेर पाणी साठा केला तर जलबुडी आंदोलनाचा इशारा !


| सांगली समाचार वृत्त |
बेळगाव - दि. १९ जुलै २०२४
कर्नाटकातील अलमट्टी धरण हे सध्या 81% भरले असून 65 हजार किसेसने विसर्ग सुरू केला असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीतून अलमट्टी धरणात 72 हजार 286 क्युसेस पाणी जमा होत आहे सध्या 99. 32 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आता यापेक्षा अधिक प्रमाणात पाणी वाढले तर कोल्हापूर सह सांगली साताऱ्यातील नदीकाठ धोक्यात येऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रमाणाबाहेर पाणी साठा केला तर जलबुडी आंदोलन असा इशारा कृष्णा नदी महापूर नियंत्रण समिती आणि आंदोलन अंकुश यांनी एका निवेदनाद्वारे शासनाला दिला आहे.


मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथील पाणी पातळी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठेवली जात आहे की नाही, याबाबत बारकाईने देखरेख करा. तसे आढळले नाही, तर तातडीने कर्नाटक प्रशासनाशी संपर्क साधून, पाण्याची पातळी कमी करायचा आग्रह धरा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगली, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाला दिले होते. परंतु दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा प्रशासन तसेच कार्यकारी अभियंते यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान पुढील आठ दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज भारतीय हवामान तज्ञांनी व्यक्त केला असून सध्या सांगली जिल्ह्यातील चांदोली सातारा जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी या दोन्ही जिल्ह्यातील तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ही धरणातील पाणी साठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. अपेक्षेप्रमाणे पाऊस पडला तर पुढील वर्षभर शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटू शकतो.