| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ जुलै २०२४
ठाणे येथील गोरगरीब नागरिकांसाठी आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ पूर्वी एकनाथ शिंदे यांनी 'आनंदाचा शिधा' ही योजना राबवली होती. मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच, ही योजना याच नावाने संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित केली. त्यामुळे गोरगरिबांचा दिवाळी व दसरा हे दोन महत्त्वाचे सण गोड झाले आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे ही लोकप्रिय झाले.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेले दोन महिने बंद असणारा 'आनंदाचा शिधा' विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यापासून पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे येणारा गोरगरिबांचा गणेशोत्सवही गोड होणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने तब्बल 562 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
महाराष्ट्राच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने याबाबतचा आदेश जारी केला असून राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये दारिद्र रेषेखालील केशरी शिधा पत्रिका धारकांना केवळ शंभर रुपये दरात हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या महिन्यात ई पास प्रणाली द्वारे केवळ शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये एक किलो हरभरा डाळ, साखर व एक लिटर सोयाबीन तेल असे साहित्य असणार आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.