Sangli Samachar

The Janshakti News

56 इंच छातीवाल्या नरेंद्र मोदी यांची आक्रमकता नव्याने अधोरेखित !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ६ जुलै २०२४
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 'चारसोपार' चा दिलेला आकडा फोल ठरलाच, परंतु स्वबळावर केंद्रात सत्ताही स्थापन करता येऊ शकले नाही, त्यांना मित्र पक्षाच्या कोंबड्या घ्याव्या लागल्या. तर काँग्रेसने सदस्यांची शंभरी ( खा. विशाल पाटील यांच्या पाठिंब्यासह ) गाठली. महाविकास आघाडीतील इतर पक्षांनीही बऱ्यापैकी कामगिरी केली.

या पार्श्वभूमीवर भाजपाला विशेषतः नरेंद्र मोदी यांना कोंडीत पकडता येईल ही विरोधकांची अपेक्षा मात्र पूर्ण होईल याची खात्री देता येत नाही. स्वबळावर बहुमत न मिळाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नमते घेतील, या विरोधी पक्षांच्या स्वप्नावर विरजण पडले आहे.

नुकतेच संसदेचे अधिवेशन संपले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकार आणि विरोधी पक्षात जोरदार चकमक बघायला मिळाली. दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी ओम बिर्ला आणि जगदीप धनखर यांनी गोंधळ घालणाऱ्यांवर कडक ताशेरे ओढले. यामुळे दोन्ही सभागृहातील राजकीय वातावरण तापले. यावेळी विरोधी पक्षाने नरेंद्र मोदी यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी तितक्याच समर्थपणे विरोधी पक्षाची कोंडी फोडून आपली 56 इंच छातीची इमेज कायम ठेवली.

सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या रालोआ सरकारला आपल्या कमजोरीचा फायदा कॉग्रेससह विरोधी पक्षांना घेवू द्यायचा नाही असे दिसून येत आहे. सत्तापक्ष आणि विरोधक यांच्यातील या मानसिक राजकीय युद्धाची झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यातील उघड शब्दांच्या बाचाबाचीत स्पष्टपणे दिसून आली.