| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ जुलै २०२४
धरण आणि कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रातील संततधार पावसामुळे कृष्णा नदीचे पाणी पातळी इंचा इंचाने वाढत असून सध्या ती 40 फुटावर पोहोचली आहे. शहरातील अनेक भागात महापुराचे पाणी शिरले असून, नागरिकांचे स्थलांतर सुरूच आहे.
आज सकाळी साडेदहा नंतर कोयना धरणातील पाणी चाळीस हजार क्युसेसने वाढवणार असल्याने नागरिकांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान अलमट्टीचा निसर्ग तीन लाखापर्यंत करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक पाटबंधारे विभागाचे अधिकारी एकमेकांशी संपर्क ठेवून असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्कात आहेत.
या पार्श्वभूमीवर काल कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील यांचे जलसंपदा विभागाचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणालेसाहेब यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. या संभाषणाची ऑडिओ क्लिप आणि एक निवेदन सोशल मीडिया वरून वायरल झाले असून, यामध्ये दोन्ही मान्यवरांनी कर्नाटकच्या शासन, प्रशासनावर टीकेचे बोट ठेवले आहे. परंतु यामुळे नागरिकात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अलमट्टीच्या अधिकाऱ्यांचे आणि शासनाचे हेकेखोर वागण्यामुळे अलमट्टीचे पाणी कोल्हापूर सांगलीच्या नागरिकांच्या मुळावर उठण्याची ही तिसरी वेळ आहे. सांगलीतील पूर पातळी धोका पातळीपर्यंत पोहोचणार ती धोका पातळी ओलांडणार ? याची भीती नागरिकांना लागलेली आहे. नागरिकांनी आलेल्या परिस्थितीशी लढा देण्यास सज्ज राहावे, प्रशासन तुमच्या बरोबर आहे, असा दिलासा आ. गाडगीळ यांनी दिला आहे. सांगलीतील कृष्णा नदीचे पाणी रात्रीपासून आज साडेदहापर्यंत अवघे सात इंचाने वाढले आहे. परंतु कोयना धरणाच्या विसर्गाने प्रश्न अजून किती फुगते यावर महापुराचे गणित अवलंबून आहे.