| सांगली समाचार वृत्त |
संगली दि. ११ जुलै २०२४
महापालिका प्रभाग 9 मधील कचरा घंटागाडीतील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका महिला नागरिकाचा कचऱ्यातून नजर चुकीने आलेला 25 हजाराचा मोबाईल त्या नागरिकांना शोधून पुन्हा परत देण्यात आला. या प्रामाणिक पणाबद्दल नागरिकांनी महापालिका कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
प्रभाग 9 मध्ये सिध्देश्वर हौसिंग सोसायटी येथे सकाळच्या सुमारास महापालिकेची घंटागाडी कचरा संकलित करीत होती. यावेळी येथील गोरे नामक नागरिकांच्या कचऱ्यातून 25 हजाराचा अँड्रॉइड मोबाईल घंटागाडीत पडला. गाडी पुढे गेल्यानंतर गोरे याना मोबाईल घंटागाडीमध्ये पडल्याचे समजले. त्यानंतर गोरे यानी माजी स्थायी सभापती संतोष पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. यावेळी संतोष पाटील यांनी मुकादम बाबासाहेब जाधव यांच्याशी संपर्क साधून संबधित घंटागाडी खाली न करण्याबाबत चालकास सांगण्याबाबत सांगितले. यानंतर स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, मुकादम बाबासाहेब जाधव, घंटागाडी चालक नुमान नगाराजी, राजेंद्र थोरात आणि तानाजी लोंढे यानी घंटागाडी त्या नागरिकांच्या घरासमोर नेली आणि त्यांच्या समोरच मोबाईल शोधण्यास सुरुवात केली. यावेळी गोरे यांनी टाकलेल्या कचऱ्यामध्ये मोबाईल आढळून आला. त्यामुळे आपला गेलेला मोबाईल मिळाल्याने गोरे यांनी समाधान व्यक्त करीत मनपा कर्मचारी यांचे आभार मानले.