| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जुलै २०२४
पश्चिम महाराष्ट्रात वीजचोरीविरोधी एकदिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 1152 ठिकाणी सुमारे 1 कोटी 58 लाख रुपयांच्या अनधिकृत वीज वापराचे प्रकार उघडकीस आले. यामध्ये वीजतारेच्या हुकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार करून 896 ठिकाणी 99 लाख 98 हजार रुपयांची थेट वीजचोरी झाल्याचे आढळून आले, अशी माहिती सांगली महावितरण विभागाकडून देण्यात आली.
पुणे प्रादेशिक विभागअंतर्गत पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या निर्देशानुसार नुकतीच वीजचोरीविरुद्ध एकदिवसीय विशेष मोहीम राबविण्यात आली. त्याप्रमाणे सकाळी 9 वाजता सर्वच जिल्ह्यांमध्ये या मोहिमेला सुरुवात झाली व सायंकाळी उशिरापर्यंत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी वर्गवारीतील वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली.
यामध्ये ज्या उद्देशासाठी वीज जोडणी घेतली, त्याऐवजी वाणिज्यिक व इतर कारणांसाठी वापर सुरू असलेले 256 प्रकार उघडकीस आले असून त्यांना कलम 126 नुसार दंड, व्याजासह 58 लाख 19 हजार रुपयांचे वीजबिल देण्यात आले आहे. तसेच थेट चोरीद्वारे विजेचा वापर होणारे 896 प्रकार या मोहिमेत उघड झाले. त्यांना कलम 135 नुसार वीजचोरीप्रकरणी दंड व वीज वापराचे 99 लाख 98 हजार रुपयांचे बिल देण्यात आले आहे.
पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी वीजचोरीविरुद्ध पश्चिम महाराष्ट्रात एकाचवेळी महिन्यातून एक दिवस विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात एकूण 23 हजार 518 ठिकाणी 80 कोटी 71 लाख रुपयांच्या वीजचोर्या उघडकीस आल्या आहेत. यात सन 2022-23 मध्ये 44 कोटी 31 लाख आणि सन 2023-24 मध्ये 36 कोटी 40 लाख रुपयांच्या वीजचोर्या उघड केल्या आहेत, तर 107 ठिकाणी संबंधित वीजचोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली .