Sangli Samachar

The Janshakti News

"काही दिसतच नाही" - छोट्या नातीच्या 'त्या' प्रसंगाने माझे डोळे उघडले ! (✒️ राजा सांगलीकर)


| सांगली समाचार वृत्त |
बंगळुरु - दि. ५ जुलै २०२४
माझी ३−४ वर्षांची नात एके दिवशी सकाळी झोपेतून उठली ती रडतच. तिची आई म्हणजे माझी सून, कांही तरी सांगून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होती. पण नातीचे रडणे कांही थांबत नव्हते. दर दोन-तीन दिवसाआड सकाळी हे नेहमीच चालणारे रडगाणे असल्याने मी त्याकडे दुर्लक्ष केले. कांही वेळ तसाच गेला, पण नातीचे रडे कांही थांबेना नव्हते.

“अग, काय झाले एवढं रडायला, पोटात दुखतं आहे कां?”, माझ्या सुनेने माझ्या नातीला विचारले.
रडत-रडत माझ्या नातीने सांगितले,
“ऊँ..... ऊँ..... ऊँ....., आई, मला तू दिसत नाहीस, मला कांहीच दिसत नाही.”

'कांहीच दिसत नाही? आजवर तर असे घडले नव्हते?' नक्की काय प्रकार आहे हे पाहूया, असा विचार करून मी नातीजवळ गेलो आणि पाहतो तो काय, माझी नात बिछान्यावर उठुन बसली होती, पण डोळे न उघडताच, 'ऊँ... ऊँ... ऊँ..., मला कांही दिसत नाहीचा अखंड जप रटत होती.
काय झाले आहे याची मला कल्पना आली. हसून मी माझ्या नातीला म्हणालो.

“अग चिंगे, तू डोळे उघडलेले नाहीस, मिटलेले आहेस. डोळे मिटले असताना तूला कसे दिसेल ? डोळे उघड म्हणजे तूला सारं कांही दिसायला लागेल”.


लाडक्या आजोबांचा आवाज कानांवर पडताच फरक झाला. माझ्या नातीने आपले डोळे उघडले आणि ती आनंदाने ओरडली,

“हुरssर्रे, आता मला सगळं दिसायला लागलय,” माझ्या नातीचे रडणे थांबलेले पाहून मी माझ्या खोलीकडे परतलो.

थोड्या वेळाने माझ्या मनातील ‘तो’ नेहमीच्या कोपरा उद्भवला व म्हणाला,

“राजा, डोळे मिटून घेतले की कांही दिसत नाही, आपली दृष्टी गेली की असा विचार मनात येऊन वाईट वाटतं, दुःख होत आणि रडु येतं. हे तुला माहीत असल्याने ‘डोळे उघड’ असे सांगून तू तूझ्या नातीचे दुःख कमी केलेस, रडणे थांबवलेस नाही कां?”

मनातील ‘त्या’ कोप-याच्या प्रश्नाला आत्मप्रौढीने स्मितहास्य करत मी होकारार्थी मान हलवली.

“पण राजा, तू कधी तुझे डोळे उघडणार? मनातल्या मनात कुढायचे, रडायचे तू कधी थांबवणार ? समाधानाने, आनंदाने, सुखी जीवन जगायला कधी सुरवात करणार ? कधी समजावणार तू तूझ्या मनाला ?”

माझ्या मनातील ‘त्या’ कोप-याने माझ्यावर प्रश्नांचा भडिमार केला. मनातील ‘त्या’ कोप-याच्या प्रश्नांचा रोख लक्षात घेऊन मला थोडी चिड आली आणि उत्तरादाखल चिडक्या स्वरात मीही त्याच्यावर प्रतिप्रश्नांची तोफ डागली,

“अरे, कांहीतरीच काय बोलतोस, मी कुठं डोळे मिटून घेतलेत? आणि दुःखाने रडत आहे? उलट मी तर अगदी सुखात, समाधानात, आनंदात आहे. नेहमी असे कांहीच्याबाही कां उलट-सुलट बडबडत असतोस रे?”


“अस्सं, मी कांही तरी उलट-सुलट बडबडत आहे आणि तू मात्र नेहमी आनंदात, सुखात, समाधानात असतोस नाही कां? तर मग ऐका राजाभाऊ”

कुत्सित स्वरात माझ्या मनाचा ‘तो’ कोपरा मला सांगू लागला,

“आज जगातील कित्येक लोकांच्याजवळ खूप कांही नाही पण, तुझ्याजवळ धडधाकट निरोगी शरीर, स्वतःचे घर, गाडी, नोकरी, बँक बॅलन्स, प्रेमळ आई-वडील, सोज्वळ, सुशील पत्नी, आज्ञाधारक, हुशार मुलं ... खूप कांही आहे. आहे नां?”
मी होकारार्थी मान डोलावलेली पाहून मनातील ‘तो’ कोपरा पुढे बोलू लागला,

“मग असे सर्व कांही तूझ्या जवळ असूनही तुझ्या मारूती कारला ओव्हरटेक करून दुस-याची ऑडी कार वेगात पुढे गेली, किंवा तुझ्या सहका-याला बढती मिळाली, किंवा तुझ्या अपार्टमेंटमधील फ्लॅटच्या शेजारी कुणी टुमदार बंगला बांधला, अथवा तुझ्या मुलाच्या मित्राला आयआयटीत प्रवेश मिळाला, इतकेच काय .... तुला आवडलेला सेलमधील शर्ट तू खरेदी करायच्या आधी दुस-याच कोणीतरी खरेदी केला, किंवा प्रवाशांनी गच्च भरलेल्या बस-रेल्वेत मोकळ्या झालेल्या एकुलत्या एका जागेवर दुस-या कोणीतरी चतुराईने कबजा केला की तूला त्या व्यक्तिचा हेवा वाटतो कां नाही? जो दुस-याचा हेवा करत असतो, तो स्वतःच्या मनाची शांती हरवून बसत असतो -!, हे माहिती असूनही इतरांशी आपली तुलना करून तू मनातल्या मनात कुढत नाहीस, दुःखी होत नाहीस?”

मनातील ‘त्या’ कोप-याच्या प्रश्नांना माझ्याकडे उत्तर नव्हते. पण पडलो तरीही आपली तंगडी वरच ठेवायची या नेहमीच्या सवयींने थोड्या रागात मी ‘त्याला’ विचारले,

“मग, अशा वेळी मी काय करायला पाहिजे असे तुला वाटते? हसत, आनंद व्यक्त केला पाहिजे, पेढे वाटले पाहिजेत?”

“बिल्कुल नाही. जरूरी आहे फक्त एका छोट्याशा बाबीची! दृष्टीकोन बदलण्याची. विचारांच्या पद्धतीत बदल करायची. मनाची भूमिका, कल, प्रवृत्तीत बदल करायची. राजा, जीवनातील प्रत्येक क्षण जर ख-या अर्थाने तूला जगायचा असेल, सुखात, आनंदात, समाधानात राहायचे असेल तर, तुझ्या जवळ असलेला ग्लास अर्धा रिकामा आहे की अर्धा भरलेला आहे याचा विचार करू नकोस. तुझ्याजवळ ग्लास आहे व त्यात कांहीतरी आहे, हे ग्लास नसण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे हे ध्यानात घे.

अरे, आपल्याजवळ जे नाही त्याबद्दल शोक करत बसण्यापेक्षा आपल्या जवळ जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायचे, त्याचा आनंद घ्यायचा. फारसी कवी-संत सा’दीच्याः माझ्या जवळ पादत्राणे नाहीत म्हणून मी तो पर्यंत रडत होतो, जो पर्यंत पाय नसलेला माणूस मला भेटला नव्हता, या वचनातील गर्भित अर्थ जाण, नेहमी लक्षांत ठेव व त्याप्रमाणे वाग. बस्स, ही छोटीशी बाब अंमलात आण आणि मग बघ, तुझे जीवन कसे सुखा-समाधानाने आनंदाने, भरून जाते.” कमी शब्दांमध्ये बरेच कांही शिकवून माझा मनाचा ‘तो’ कोपरा जिथून आला होता तिथे परतला.

मी विचार करू लागलो आणि मला पटले. माझ्या मनातील ‘त्या’ कोप-याचे बोल खरे आहेत. आजवर अयोग्य विचारांच्या आंधळेपणाने माझ्याजवळ जे आहे त्याकडे माझे दुर्लक्ष झाले होतो. इतरांच्या यशाचा, स्थितीचा हेवा करत मी मनाची शांती हरवुन बसलो होतो. आणि मी ठरवले बस्स झाले. यापुढे तरी आपण विचार करण्याच्या आपल्या पद्धतीत बदल करायचा आणि आपले उर्वरीत जीवन सुखात, आनंदात, समाधानात कंठायचे.
- आजचे बोल अंतरंगाचे पुर्ण
संदर्भ १. भगवान बुद्ध (अनामिक?)