yuva MAharashtra 'संघाच्या कार्यकर्त्यांची मदतीऐवजी सेल्फी शेअर करुन..'; मोदींचा उल्लेख करत RSS चा BJP ला टोला !

'संघाच्या कार्यकर्त्यांची मदतीऐवजी सेल्फी शेअर करुन..'; मोदींचा उल्लेख करत RSS चा BJP ला टोला !



| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. १३ जून २०२४
लोकसभा निवडणुकीमध्ये 240 जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कामगिरीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर'मधून निशाणा साधण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल हे 'अतिआत्मविश्वासी' भाजपा कार्यकरत्यांसाठी आणि त्यांच्या अनेक नेत्यांना वास्तवाचे दर्शन देणारे ठरलेत. कारण हे सर्वजण त्यांच्याच विश्वास रमले होते. तसेच हे सर्वजण मोदींच्या प्रभावाखाली आनंदात होते. त्यांनी सर्वसामान्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं, अशा शब्दांमध्ये भाजपाच्या नेत्यांचे कान मातृक संघटनेनं टोचले आहेत.

भाजपाचे कान टोचले

लोकसभा निवडणुकीत '400 पार'चा नारा देणारा भाजपा 240 जागांवरच अडखळला. याचे कारण म्हणजे नरेंद्र मोदींचीच हवा असल्याच्या अतिआत्मविश्वासात असलेले भाजपचे नेते व कार्यकर्ते 'ग्राउंड रिॲलिटी'पासून अनभिज्ञ राहिले. त्यामुळे पदरी अपयश आले, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातील लेखातून भाजपचे कान टोचण्यात आले. 'ऑर्गनायझर' मासिकाच्या अंकात संघाचे आजीव स्वयंसेवक असलेल्या रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे.


सेल्फी कार्यकर्त्यांवरुन निशाणा

'ऑर्गनायझर'च्या लेखामध्ये पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकीत सहकार्य करण्यासाठी स्वयंसेवकांशी संपर्कही केला नसल्याचं म्हटलं आहे. नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या जुन्या समर्पित कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याचंही लोकसभा निवडणुकीच्या निकालामधून स्पष्ट होत असल्याचंही लेखात म्हटलं आहे. अनेक वर्षांपासून संघासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी सेल्फी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आलेल्या कार्यकर्त्यांना अधिक महत्त्व देण्यात आल्याने पदरी निराशा आल्याचा टोला या लेखातून लगावण्यात आला आहे. "सोशल मीडियावर पोस्टर्स आणि सेल्फी शेअर करुन ध्येय साध्य करता येत नाही. यासाठी मेहनत घ्यावी लागते. तरच ध्येय साध्य करता येतं," असा टोला लेखातून लगावण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कामगिरीवर नाराजी

महाराष्ट्रातील कामागिरीवर या लेखातून विशेष नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात भाजपा व शिंदेंच्या शिवसेनेकडे पुरेसे बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतले, हा प्रश्नच असल्याचं लेखात म्हटलं आहे. साधारण अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधून बाहेर पडलेल्या आमदारांच्या मदतीने भाजपाने महाविकास आघाडी सरकार उलथवून लावत सत्ता स्थापन केली. भाजपा आणि शिंदे गटाचं सरकार राज्यात झालं. त्यानंतर 2023 मध्ये मे महिन्यात अजित पवार यांच्यासहीत आमदारांचा मोठा गट मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडला आणि शिंदे सरकारबरोबर सत्तेत सहभागी झाला. मात्र अजित पवार गटाला का सत्तेत घेतलं हे नकळण्यासारखं असल्याचं संघाने म्हटलं आहे.