Sangli Samachar

The Janshakti News

खासदाराच्या मुलीनं फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीला BMW खाली चिरडलं; पोलिसांकडून तात्काळ जामीन मंजूर !


| सांगली समाचार वृत्त |
चेन्नई - दि. १९ जून २०२४
पुण्यात बड्या बापाच्या लाडक्या बाळाने पोर्शे कारने जोडप्याला उडवल्याचे प्रकरण देशभरात गाजत असताना आता चेन्नईतही हिट अँड रनचे एक हायप्रोफाईल प्रकरण समोर आले आहे. चेन्नईत राज्यसभा खासदाराच्या मुलीने फुटपाथवर झोपलेल्या एका व्यक्तीला BMW कारने चिरडले. या घटनेमध्ये सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र अपघातानंतर खासदाराच्या मुलीला पोलीस स्थानकातूनच तात्काळ जामीन मंजूर झाला.

ही घटना सोमवारी रात्री (17 जून) घडली आहे. वायएसआर काँग्रेस पार्टीचे राज्यसभा खासदार बीडा मस्तान राव यांची मुलगी माधुरी हिच्यावर फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीला BMW कारने चिरडल्याचा आरोप आहे. या घटनेमध्ये 24 वर्षीय सूर्या याचा मृत्यू झाला. तो पेंटिंगचे काम करत होता. आठ महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. ही घटना घडली तेव्हा माधुरी नशेमध्ये धुंद होती. ती स्वत: कार चालवत होती आणि कारमध्ये तिच्यासोबत एक महिलाही होती. चेन्नईच्या बेसेंट नगर भागात फुटपाथवर झोपलेल्या सूर्याच्या अंगावर माधुरीने आलिषान गाडी चढवली. अपघातानंतर माधुरी तिथून फरार झाली, तर गाडीतील दुसरी महिला खाली उतरून लोकांशी हुज्जत घालू लागली.


अटक आणि तात्काळ जामीन

अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत सूर्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता सदर BMW कार वायएसआरचे राज्यसभा खासदार बीडा मस्तान राव यांच्या समुहाची असून पुद्दुचेरी येथे रजिस्टर असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी आरोपी माधुरी हिला बेड्या घातल्या. मात्र पोलीस स्थानकामधूनच तिला तात्काळ जामीनही मंजूर केला. यानंतर मयत सूर्याच्या कुटुंबियांनी आणि कॉलनीतील लोकांनी जे-5 शास्त्रीनगर पोलीस स्थानकाला घेराव घालत आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

मोबाईल नंबरद्वारे केले ट्रॅक

दरम्यान, अपघातानंतर माधुरीसोबत असणाऱ्या महिलेने आम्ही रुग्णवाहिकेला फोन कॉल केला असल्याचे सांगितले. अपघातानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओतून हे स्पष्ट झाले आहे. मात्र अपघातस्थळावरून फरार झालेल्या आरोपी माधुरी हिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोबाईल ट्रॅकरचा वापर केला. माधुरी आणि तिच्या मैत्रिणीला मोबाईल नंबरद्वारे ट्रॅक करण्यात आले आणि अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर तात्काळ जामीनही मंजूर केल्याने पोलिसांच्या कारवाईवर शंका उपस्थित होत आहे.