| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १५ जून २०२४
अजित पवारांना महायुतीमध्ये घेऊन लोकसभा निवडणुकीत महायुतीला लाभ होण्याऐवजी तोटा झाला. या पार्श्वभूमीवर सगळीकडून टीकेची झोड उठूनही अजित पवारांना सत्तेची वळचण सोडवेनाशी झाली आहे, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र अजितदादांचा पुळका आला आहे. अजित पवारांना महायुतीत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी करून घेतली. त्याचा फटका भाजपला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत बसला, अशा परखड शब्दांमध्ये संघाचे एक निकटवर्ती रतन शारदा यांनी ऑर्गनायझर मध्ये लेख लिहून महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांची कानउघडणी केली. त्या पाठोपाठ सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि संघाच्या वरिष्ठांची काही वक्तव्ये आली. या वक्तव्यांचा थेट अजित पवारांच्या संदर्भातल्या कुठल्याही निर्णयाशी संबंध नव्हता, पण भाजपला सहन कराव्या लागलेल्या अनपेक्षित अपयशाच्या दृष्टीने ती वक्तव्य बोचणारी होती.
या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली. महायुतीच्या अपयशाचे सगळे खापर अजित पवारांच्या माथ्यावर फुटत असल्याची त्यांची भावना तयार झाली, पण दरम्यानच्या काळात अजित पवारांनी महायुतीचा स्वतःची घराणेशाही टिकवण्यासाठी वापर करून घेतला. बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव होऊन देखील अजित पवारांनी त्यांना राज्यसभेची संधी दिली. हे सगळे अजितदादांनी महायुतीच्या बळावर केले. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी मात्र संघाच्या वक्तव्यावर वेगवेगळ्या आक्षेप घेतले. महाराष्ट्रात अजित पवारांमुळे पराभव झाला असेल, तर उत्तर प्रदेशात अजित पवार गेले नव्हते मग तिथे भाजपचा पराभव का झाला??, असा सवाल भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. राष्ट्रवादीच्या अन्य प्रवक्त्यांनी देखील अजितदादांची बाजू उचलून धरली.
मात्र, आता अचानक शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना अजित पवारांविषयी सहानुभूती निर्माण होऊन ते अजितदादांच्या बाजूने मैदानात उतरले. भाजप अजित पवारांचा वापर करून घेऊन त्यांना दूर करतो आहे का??, असा संशय जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांनी व्यक्त केला. भाजप महाराष्ट्रातल्या लोकनेत्यांना संपायला निघाला आहे. तसाच तो अजित पवारांना संपवतो आहे, असा दावा रोहित पवारांनी सोशल मीडिया अकाउंट वरून केला. मात्र महायुतीच्या बळावर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बिनविरोध राज्यसभेच्या खासदार झाल्या, त्याबद्दल रोहित पवारांनी त्यांचे अभिनंदन केले. या सर्व प्रकारात संघाकडून टीकेची झोड उठूनही स्वतः अजित पवारांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, फक्त आपण विकासाला प्राधान्य देतो आणि इथून पुढे विकासालाच प्राधान्य देत राहू, असे अल्प वक्तव्य त्यांनी करून मूळ मुद्द्याला बगल दिली.
दरम्यानच्या काळात अजित पवार आणि शरद पवार आरोपी असलेल्या राज्य सहकारी शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या क्लोजर रिपोर्ट विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माजी आमदार माणिकराव जाधव यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. या प्रकाराची सुनावणी 29 जून रोजी होणार आहे. मात्र, अण्णा हजारे यांच्या मागे नेमके कोणाची प्रेरणा आहे??, असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केला. त्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दुजोरा दिला. सहकारी शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार आणि शरद पवार अडचणीत येत असल्याचे पाहून दोन्ही राष्ट्रवादी या मुद्द्यावर एक होऊन अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्यावर बरसल्या. हे सगळे सुरू असताना अजित पवारांनी महायुतीचा लाभ घेत आपल्या पत्नीला राज्यसभा खासदार केले आणि सत्तेची वळचण सोडलेली नाही. महाराष्ट्र भाजप मधल्या कुठल्याही महत्त्वाच्या नेत्यांनी अजून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.