Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत भरदिवसा दिड लाखांची चोरी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ जून २०२४
भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेल्या १ लाख ६२ हजारचे दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला मारला. ही घटना सोमवार दि. १७ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या कालावधीत कर्नाळ रस्त्यानजीक घडला. याबाबत इम्रान फकीरमहंमद कसाब (रा. कर्नाळ रस्ता, वसंत पेट्रोलपंपानजीक, सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. फिर्यादी इम्रान कसाब यांचा जनावरे विक्रीचा व्यवसाय आहे. 


काही कामानिमित्त इम्रान हे सकाळी ११ च्या सुमारास घरास कुलूप लावून बाहेर गेले होते. सायंकाळी ६ च्या सुमारास ते परत आले. तेवढ्या कालावधीत चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप फोडून आत कपाटात ठेवलेले दागिने तसेच रोख २५ हजार रुपये लंपास केले. चोरट्याने सोन्याची बोरमाळ, रिंग, टॉप्स, मण्यांची माळ, ब्रेसलेट, पैंजण, अंगठ्या आदी दागिने चोरले. ही बाब इम्रान हे घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आली. पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.