yuva MAharashtra मोहन भागवत घेणार 'या' बड्या नेत्याची भेट, या भेटीचा अर्थ काय ?

मोहन भागवत घेणार 'या' बड्या नेत्याची भेट, या भेटीचा अर्थ काय ?


| सांगली समाचार वृत्त |
गोरखपूर - दि. १५ जून २०२४
लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS)सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत. दोघांची ही भेट गोरखपूरमध्ये होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या खराब कामगिरीनंतर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. कारण लोकसभा निवडणूक आणि उत्तर प्रदेशमध्ये संघाचा विस्तार यापासून इतर मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. 

या भेटीचा नेमका अर्थ काय ?

एकीकडे भाजपने 400 पारचा दिलेला नारा काही त्यांना खरा ठरवता आला नाही. किंबहुना मित्र पक्षांच्या साथीने त्यांना केंद्रात सत्ता स्थापन करावी लागली. असं असताना योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवत यांच्या भेटीचा नेमका अर्थ काय? याविषयी सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी ही भेट ठरविण्यात आलेली आहे का? अशी चर्चाही दबक्या आवाजात सध्या सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत असा प्रचार सुरू होता की, भाजपच्या 400 जागा आल्या तर योगी यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावरून हटविण्यात येईल. उत्तर प्रदेशमध्ये असंही म्हटलं जात होतं की, 'मोदी आयेगा तो योगी जायेगा...' याच प्रचाराचा भाजपला उत्तर प्रदेशमध्ये काही प्रमाणात फटका बसला. यामुळेच मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भेटीतून पंतप्रधान मोदींना नेमका इशारा दिल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मोहन भागवत यांनी चिउटाहा येथे एसव्हीएम पब्लिक स्कूलमध्ये सुरू असलेल्या संघ कार्यकर्ता विकास वर्ग शिबिरात स्वयंसेवकांना संबोधित केले, जेथे प्रशिक्षण शिबिर 3 जूनपासून आयोजित करण्यात आलेलं आहे. या प्रशिक्षण शिबिरात सुमारे 280 स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.


गुरुवारी, मोहन भागवत यांनी काशी, गोरखपूर, कानपूर आणि अवध प्रदेशात संघाची जबाबदारी सांभाळत असलेल्या संघाच्या सुमारे 280 स्वयंसेवक कार्यकर्त्यांशी संघाचा विस्तार, राजकीय परिस्थिती आणि सामाजिक चिंता यावर चर्चा केली.

मिळालेल्या माहितीनुसार, संघप्रमुखांनी शाखांची संख्या आणि संघटनेचा विस्तार करण्यावर भर दिला असून, संघातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांचा विस्तार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपचे निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्यानंतर आरएसएस नेत्यांकडून सातत्याने वक्तव्ये येत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर मोठे विधान करताना सत्ताधारी भाजपला 'अहंकारी' आणि विरोधी इंडिया ब्लॉकला 'रामविरोधी' म्हटले आहे. इंद्रेश कुमार म्हणाले, राम सर्वांना न्याय देतो. 2024 च्या लोकसभा निवडणुका बघा. ज्यांनी रामाची पूजा केली, पण हळूहळू त्यांच्यात अहंकार निर्माण झाला. त्या पक्षाला सर्वात मोठा पक्ष बनवला. पण त्याला जे पूर्ण अधिकार मिळायला हवे होते, जे अधिकार मिळायला हवे होते ते त्यांच्या अहंकारामुळे मिळाले नाही.