yuva MAharashtra सांगलीत उद्यापासून तीन दिवस पोलीस भरती प्रक्रिया; मैदानी चाचणीबाबत शासनाचा मोठा निर्णय !

सांगलीत उद्यापासून तीन दिवस पोलीस भरती प्रक्रिया; मैदानी चाचणीबाबत शासनाचा मोठा निर्णय !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ जून २०२४
सांगली पोलीस दलातील ४० जागांसाठी १९ ते २१ जून दरम्यान भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आणि गुणवत्तेवर आधारित असल्याने उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपली कुशलता स्पर्धेत सिध्द करावी असे आवाहन पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केले.

दरम्यान महाराष्ट्र पोलिस दलाने मैदानी परिक्षेच्या तारखांच्या होत असलेल्या मागणीची दखल घेतली आहे. पोलिस भरती 2022-23 मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत व त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील, असा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

तसेच राज्यात सुरु असलेल्या पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या भरतीतील मैदानी परिक्षेच्या तारखा या एकाच दिवशी किंवा सलग दिवशी लागून आल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मांडला होता. सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता पोलिस भरती व एसआरपीएफभरतीच्या तारखा बदलाव्यात, अशी मागणी त्यांनी केली होती.