Sangli Samachar

The Janshakti News

शिंदेंच्या मंत्रिमंडळाबाबत सर्वात मोठी बातमी, नवी माहिती समोर !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ जून २०२४
शिंदे, फडणवीस सरकारचा चौथा आणि शिंदे, फडणवीस, पवार सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे, आपल्याला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावं यासाठी पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षातील आमदारांनी लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या आमदाराची वर्णी लागणार याची चर्चा आता जोरदार रंगू लागली आहे.

सत्ताधारी पक्षातील आमदारांकरता पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. यामुळे सत्ताधारी पक्षातील सर्वच आमदारांनी आता मुंबईत तळ ठोकला आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यामुळे सत्ताधारी आमदार मुंबईतच तळ ठोकून आहेत. कारण कधीही फोन येईल. ही या सरकारमध्ये मंत्रिपदाची शेवटीची संधी असून, मंत्रिपदाचा टिळा माथी लावून घ्यायला सत्ताधारी पक्षातील सर्वच आमदारांनी जोरदार लॉबिंग सुरु केली आहे. हे आमदार सतत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि अजित पवार यांची भेट घेत आहेत. आपलीच वर्णी लागावी याकरता आमदारांनी अगदी देव ही पाण्यात ठेवलेत. मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत थेट सांगूनच टाकलं आहे.

नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीला जोरदार फटाका बसला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदारांना ताकद पुरवण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत कोण कोणत्या भागात फटका बसला आहे, त्या भागात पुन्हा कशी आपण उभारी घेवू शकतो. मतदारांना आपल्या बाजुनं कसं वळवू शकतो? याकरता कोणता आमदार मंत्री म्हणून काम करु शकेल, दिलेलं टार्गेट पुर्ण करू शकेल यासाठी महायुतीमध्ये बैठकांचा धडाका सुरू आहे.

नव्याने होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात काही आमदारांची संभाव्य मंत्री म्हणून नावे चर्चेत आहेत. यामध्ये भाजपकडून प्रविण दरेकर, प्रसाद लाड, जयकुमार रावल, संजय कुटे, गणेश नाईक, आशिष शेलार, राहुल कुल यांचं नाव चर्चेत आहे. शिवसेनेकडून संजय शिरसाठ, भरत गोगावले, बालाजी किणीकर, प्रताप सरनाईक, योगेश कदम यांची नावं चर्चे आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अमोल मिटकरी, मकरंद पाटील, रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव चर्चेत आहे. पावसाळी अधिवेशनाआधीच मंत्री मंडळ विस्ताराचा बार उडवून दिला जाईल. कारण निवडणुका लागायला काही महिने उरले असताना का होईना आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मंत्रिपद फायद्याचे ठरेल. चांगले काम केल्यास पुन्हा सत्तेत आल्यास आपल्या नावाचा विचार होईल, अशी भावना आमची असून आम्ही मंत्रिपद स्विकारू असं सत्ताधारी आमदार खासगीत बोलत आहेत.