yuva MAharashtra उद्यापासून घेऊन येतोय, राजाभाऊ सांगलीकर यांच्या '‘मन माझे ओढाळ, ओढाळ’' पुस्तकातील कथा मालिका !

उद्यापासून घेऊन येतोय, राजाभाऊ सांगलीकर यांच्या '‘मन माझे ओढाळ, ओढाळ’' पुस्तकातील कथा मालिका !



सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ जून २०२४
आपल्या प्रत्येकाचेच आयुष्य अनेक कटू गोड अनुभवांनी भरलेले असते. येणारे हे अनुभव आपल्याला पुढील आयुष्यासाठी बऱ्याचदा दिशादर्शक ठरतात. कारण माणूस अनुभवानी शहाणा होतो, असे म्हणतात. गतकाळात झालेल्या चुका सुधारून आपण पुढे जाण्यासाठी हे अनुभव खूप आवश्यक असतात. परंतु केवळ आपल्या आयुष्यातील येणारे अनुभवच आपल्याला जीवनात उपयोगी पडतात असे नाही, तर इतरांच्या आयुष्यातील अनुभव हे आपल्याला 'दीपस्तंभ' ठरू शकतात. आणि म्हणूनच "मन ओढाळ ओढाळ" या कथासंग्रहातील कथांची नवी मालिका उद्यापासून सांगली समाचारच्या वाचकांसाठी सुरू करीत आहोत...


लेखकाचे मनोगत !

राजा सांगलीकर, म्हणजे मी, एक जीवंत, चांगल्या, वाईट हजारो भावनांनीयुक्त एक सर्वसामान्य मनुष्य. खरंतर, लेखन हा कांही माझा पेशा नाही. आजवरचे आयुष्य खर्डेघाशी आणि इतर अनेक व्यवसाय व उपद्व्याप करण्यात घालवलेले, पण जीवनामध्ये एक काळ असा आला आणि वाटले, आजवर आपले घुसमटलेले, दबुन राहिलेले मनातील विचारतरंग कुठेतरी मोकळे करून मन हालके करावे. 

दैनंदिन जीवन जगताना आपल्या ज्या कांही चुका झाल्या, ज्यांच्या परिणामी ताण-तणाव, अपेक्षाभंग, त्रास, दुःख यांना सामोरी जावे लागले त्यांची कुठेतरी नोंद केली जावी. प्रेम, माया, करूणा, परस्पर सौहार्द, धैर्य, प्रामाणिकपणा, कृतज्ञता या व अशा भावनांबरोबरच द्वेष, क्रोध, भय, मत्सर, नैराश्य, खंत, या अशा अगणित भावना माझ्याच एका मनामध्ये आहेत, हे सत्य जसे मला समजुन चुकले तसे इतरांनीही सोप्या, सामान्य दैनंदिन बोलीभाषेमध्ये समजावे. आणि जीवनाची वाटचाल सुखाची, समाधानाची, तृप्ततेची होण्यासाठी नेमकी कशाची आवश्यकता आहे याची आपल्याला अनुभवाने जी जाण आली, त्याची इतरांना माहिती व्हावी या उद्देशाने ‘अंतरंगा’मध्ये जे बोल उठले ते म्हणजे या कथा आणि त्यांचा संग्रह ‘मन माझे ओढाळ, ओढाळ’!


राजाभाऊ सांगलीकर ! सांगलीच्या मुद्रण व्यवसायातील एक लोकप्रिय नाव... मुद्रण संघाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सोबतीच्या सहकार्याने मुद्रकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले. काही चांगले निर्णय मुद्रण व्यावसायिकांसाठी फायद्याचे ठरले. राजाभाऊ सांगलीकरांच्या अनुभवसंपन्न लेखणीतून ही मालिका साकारली आहे.