yuva MAharashtra शपथविधी समारंभाचा इतिहास कुठून सुरु होतो ? भारतात कधीपासून सुरु झाली शपथविधीची प्रथा ?

शपथविधी समारंभाचा इतिहास कुठून सुरु होतो ? भारतात कधीपासून सुरु झाली शपथविधीची प्रथा ?



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १३ जून २०२४
भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी नुकतीच तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवनामध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या सोहळ्याला आठ हजारहून अधिक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये इतर देशांतील राष्ट्रप्रमुखांनाही आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, शपथ घेण्याची ही प्रथा नेमकी कधीपासून आणि का सुरू झाली? भारतामध्ये शपथ घेण्याच्या प्रक्रियेत आजवर कशाप्रकारे बदल होत गेला आहे? याची माहिती घेणे निश्चितच माहितीपूर्ण अआहे..

शपथविधीची प्रथा कुठून आली ?

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीपासून शपथविधीची प्रथा अस्तित्वात आहे. प्रत्येक देशाची आपापली अशी वेगळी शपथविधी समारंभाची प्रक्रिया आहे. भविष्यात विशिष्ट पदाला भूषवताना विशिष्ट मार्गाने वागण्याचे वचन स्वत:ला आणि इतरांनाही देण्याची ही प्रक्रिया असते. शपथविधी समारंभाचे मूळ शोधायला गेल्यास ते पश्चिम युरोपच्या इतिहासामध्ये कित्येक शतके मागे सापडते. ‘द कॉन्व्हर्सेशन’मधील एका अहवालानुसार, सर्वांत पवित्र अशी शपथ ही ‘सॅक्रेमेंटम’ची मानली जायची. हा एक लॅटीन शब्द असून तो लष्करी सेवेसाठी घेतलेल्या शपथविधीसाठी वापरला जायचा. या विधीमध्ये थेट रोमन देवांना साक्षी ठेवून शपथ घेतली जायची. या शपथेनुसार, सैनिक एखाद्या पदाच्या कर्तव्याशी तसेच रोमन सम्राटाशी एकनिष्ठ राहण्याचे वचन घ्यायचा. जर त्याने आपले कर्तव्य अथवा निष्ठा मोडली तर तो गंभीर शिक्षेसही पात्र ठरायचा.

जसजसा काळ सरत गेला तसतशी शपथविधीची प्रक्रिया जगभरातील विविध राष्ट्रांमध्येही परवलीची झाली. जगभरातील विविध राजे राज्याभिषेकावेळी न्यायाने राज्य करण्याची आणि प्रजेचे संरक्षण करण्याची शपथ घेऊ लागले. ही शपथ देण्याचे काम शक्यतो धार्मिक गुरु करायचे. पाश्चिमात्य देशांमधील धर्मगुरू जसे की बिशप वा मठाधिपती या शपथविधी समारंभाचा अविभाज्य भाग ठरत गेले. आता जगातील बऱ्यापैकी सर्वच देशांमध्ये शपथविधीची प्रथा पाळली जाते. स्थळ-काळानुसार आणि विविध समाज रचनेनुसार शपथविधीच्या प्रक्रियेत बदल घडलेला दिसून येतो. उदाहरणार्थ, अमेरिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षाचा शपथविधी पार पाडतात; तर भारतामध्ये देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान पदाचा शपथविधी पार पाडतात.


भारतातील शपथविधी समारंभामध्ये कशाप्रकारे बदल होत गेले ?

भारतावर ब्रिटिशांची राजवट होती तेव्हा ब्रिटीश अधिकारी शपथविधीमध्ये त्यांच्या राजाप्रती निष्ठा व्यक्त करत असत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, मंत्रिमंडळातील मंत्री पदाची शपथ घेतात आणि भारतीय राज्यघटनेशी बांधील राहण्याची निष्ठा व्यक्त करतात. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवाहरलाल नेहरु यांनी पहिल्यांदा राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेतली. ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ठरले. जवाहरलाल नेहरुंनी तत्कालीन भारत सरकार कायदा, १९३५ च्या आधारे शपथ घेतली होती आणि भारतीय राज्यघटनेशी निष्ठा व्यक्त केली होती. यानंतरचे सर्व शपथविधी समारंभ राष्ट्रपती भवनातील डोळे दिपवून टाकणाऱ्या दरबार हॉलमध्येच पार पडले. याच दरबार हॉलमध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.

त्यानंतर १९९० मध्ये पहिल्यांदा शपथविधी समारंभाच्या प्रक्रियेमध्ये बदल झाला. राष्ट्रपती आर. वेंकटरामन यांनी दरबार हॉलऐवजी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पंतप्रधान चंद्रशेखर यांना शपथ दिली. द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बंदिस्त जागेऐवजी मोकळ्या जागेमध्ये शपथ घेऊन तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी आपण जनतेचे राजकारण करत आहोत, असा संदेश दिला. शिवाय मोकळ्या ठिकाणी जास्त लोक बसू शकतात, म्हणून हा निर्णय घेण्यात आला. १९९९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीही खुल्या जागेत शपथ घेणे पसंत केले. २०१४ आणि २०१९ मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाच कित्ता गिरवला. निमंत्रितांच्या मोठ्या संख्येमुळे त्यांचा शपथविधी खुल्या सभागृहात पार पडला. २०१४ च्या शपथविधीसाठी चार हजार, २०१९ च्या शपथविधीसाठी सहा हजार; तर आता २०२४ च्या शपथविधीसाठी तब्बल आठ हजार पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आज ९ जून रोजी पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा शेकडो वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होणार आहे. मात्र, देशात १९८४ साली पहिल्यांदाच दूरदर्शनवरून अशा प्रकारच्या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. लोकांना पहिल्यांदाच अशा प्रकारच्या ऐतिहासिक क्षणाचे थेट प्रक्षेपण पाहता आले होते. आजच्या शपथविधी सोहळ्याचा समारंभ प्रक्षेपित करण्यासाठी तब्बल १०० कॅमेरे वापरण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

शपथ कशी घेतली जाते ?

मंत्र्यांना देवाच्या नावाने शपथ घेण्याची अथवा न घेण्याची मोकळीक असते. कुणी देवाच्या नावाने तर कुणी राज्यघटनेच्या नावाने शपथ घेते. शपथ हिंदी किंवा इंग्लिशमधून घेता येते. राज्यघटनेच्या तिसऱ्या अनुसूचीनुसार पुढील शपथ दिली जाते: “मी, ‘अबक’ (शपथ घेणाऱ्याचे नाव), ईश्वराची शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापन झालेल्या भारतीय राज्यघटनेप्रती खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता आणि एकात्मता उन्नत राखीन आणि आपल्या कर्तव्यांचे श्रद्धापूर्वक आणि शुद्ध अंत:करणाने पालन करेन. तसेच मी न घाबरता तसेच पक्षपात न करता राज्यघटनेनुसार सर्व प्रकारच्या लोकांना न्याय्य वागणूक देईन.” शपथ घेतल्यानंतर मंत्री बाजूला टेबलवर ठेवलेल्या रजिस्टरवर स्वाक्षरी करतात आणि राष्ट्रपतींचे सचिवही प्रति-स्वाक्षरी करतात. समारंभानंतर राष्ट्रपतींकडून पाहुण्यांसाठी रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले जाते, यामध्ये विविध प्रकारच्या स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी असते.