| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ जून २०२४
सांगली लोकसभा निवडणुकीत संजयकाका पाटील, चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांच्यात थेट लढत झाली. पण, या निवडणुकीत चौथे 'पाटील' अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा चर्चेत होते. जयंत पाटलांमुळेच सांगलीची जागा मिळाली नसल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून त्यांच्यावर करण्यात येतो.
परंतु, लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी बाजी मारत विजय खेचून आणला. पण, निवडणुकीनंतरही जयंत पाटील आणि सांगली काँग्रेसच्या नेत्यांमधील धुसफूस कमी होताना दिसत नाही.
जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील 3 ते 4 जागा लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर माजी मंत्री, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनीही सांगली जिल्ह्यातील 4 ते 5 जागांवर लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विश्वजीत कदम ( Vishwajeet Kadam ) यांच्या घोषणेने सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस, असा संघर्ष होऊ शकतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
विश्वजीत कदम काय म्हणाले ?
"सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या आर्शीवादानं मला राज्य पातळीवर मला काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे कुणी काही बोलो विधानसभेला सांगली जिल्ह्यात 4 ते 5 जागांवर काँग्रेस 100 टक्के निवडणूक लढणार आहे," असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं.
"लोकसभा निवडणुकीत नाईक यांच्या मतदारसंघातून 9 हजारांचं मताधिक्य मिळालं. नाईक यांच्यासाठी निवडणुकीत आपल्याला अधिक ताकदीनं लढलं पाहिजे. तासगाव, कवठेमहांकाळमध्ये काही अडचण असल्याचं मला वाटत नाही. त्यामुळे या तीन जागा राष्ट्रवादीच्या 100 टक्के निवडून येतील. आणखी एखादी-दुसरी जागा आपल्याला मिळवायची आहे," असं जयंत पाटील म्हणाले होते.