सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २६ जून २०२४
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून बिघाडी होईल की काय अशी शंका व्यक्त होत होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस सर्व जागावर लढणार अशी वाचता केले होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या जिल्हाप्रमुखांना महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचे आदेश दिले होते. तर 'काकांनी' लोकसभेला आम्ही दोन पावले मागे आलो होतो. परंतु आता स्ट्राइक रेट वरून जागावाटप ठरेल असे जाहीर केले होते. त्यामुळे महाआघाडीत तीन प्रमुख पक्ष असल्याने 'तीन तिघाडी काम बिघाडी' होते की काय ? असेही बोलले जात होते.
या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापती निवडीच्या दरम्यान राहुल गांधी यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खरगे यांच्या घरी झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील प्रभारींचे कान टोचले, आणि "लोकसभेप्रमाणेच सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे जा !" असा आदेश दिला. . घटक पक्षातील शिवसेना व राष्ट्रवादीच्या महाआघाडीसाठी उपस्थित असलेल्या प्रमुखांनाही या निवडणुकीबाबत सूचना केल्या.
त्यानुसार महाराष्ट्रातील महाआघाडीतील प्रमुख नेत्यांची नवी दिल्लीत बैठक होऊन लोकसभेला ज्याप्रमाणे महाआघाडी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याशिवाय मतदारांना सामोरे गेले, तोच फंडा आता महाराष्ट्रात वापरण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आणि पहिल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे 'जिथे ज्याची ताकद जास्त, तेथे त्या पक्षाचा उमेदवार' जाहीर करायचा, आणि इतर घटक पक्षाने एक संघपणे त्या उमेदवाराच्या पाठीमागे विजयासाठी खंबीरपणे उभे राहायचे, असा निर्णय घेण्यात आल्याचेही या सूत्राने सांगितले. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल अशी शक्यता आहे.