Sangli Samachar

The Janshakti News

हिंदकेसरींच्या स्मारकासाठी निधी मिळत नसल्याने पै. भीमराव माने यांचा आत्मदहनाचा इशारा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ जून २०२४
सांगली जिल्ह्याचे वैभव हिंदकेसरी पै. स्व. मारुती माने यांच्या कवठेपिरान येथील अपूर्ण राहिलेल्या स्मारकासाठी निधी मिळत नसल्याने, सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व शिवसेना शिंदे गटाचे नेते पै. भीमराव माने यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुस्तीची अनेक मैदानी गाजवलेले, व सांगली जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण करणारे जकार्ता वीर, हिंदकेसरी पै. स्व. मारुती माने यांचे निधनानंतर त्यांचे जन्म स्थळ असलेल्या कवठेपिरान येथे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे. तत्कालीन महाराष्ट्र शासनाने यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. यापैकी उपलब्ध निधी दिल्याने काही काम पूर्ण झाले आहे. परंतु उर्वरित कामासाठी अपेक्षित निधीसाठी आतापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द फिरवलेला आहे, हे काम अपूर्ण राहिल आहे.

पै. भीमराव माने हे यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. जयंतराव पाटील हेच या स्मारकाचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रात सत्ता बदल होताच, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पै. भीमराव माने यांना निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता. म्हणून ते शिंदे गटाच्या शिवसेनेत दाखल झाले होते. मात्र अनेक वेळा भेटून, निवेदन देऊनही निधी उपलब्ध होऊ शकला नाही. आणि म्हणूनच आगामी विधानसभेच्या अधिवेशनात या स्मारकासाठी उर्वरित निधीसाठी तरतूद केली नाही तर, हातकणंगले मतदार संघातील खासदार धैर्यशील माने यांच्या घरासमोर आपण आत्मदहन करू असा इशारा सोशल मीडियावरून दिला आहे.

पै. भीमराव माने यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर राजकीय व सामाजिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. पै. भीमराव माने यांना मानणारा मोठा वर्ग सांगली जिल्ह्यात आहे. पै. माने यांनी दिलेल्या आत्मदालाच्या इशारा नंतर हा गट आक्रमक झाला असून आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेण्याची शक्यता असल्याने, राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.