Sangli Samachar

The Janshakti News

लक्ष्मण हाकेंना पाठिंबा, बीड जिल्ह्यात आख्खं गावच उपोषणाला बसलं !



| सांगली समाचार वृत्त |
जालना - दि. १९ जून २०२४
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीविरोधात ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बेमुदत उपोषण सुरू केलं आहे.आष्टी तालुक्यातील हातोला गावातील नागरिकांनी लक्ष्मण हाके यांना पाठिंबा दिला आहे. हाके यांच्यासाठी बीड जिल्ह्यातील आख्खं गावच उपोषणाला बसलं आहे. ओबीसीमधून कदापी आम्ही आरक्षण मिळू देणार नाहीत, असा निर्धार हातोला ग्रामस्थांनी केला आहे.

शरीरात पाणी कमी झाल्याने लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली

ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. शरीरात पाणी कमी झाल्याने त्यांची प्रकृती खालवले आहे. हाके यांनी उपचार घ्यावे अथवा पाणी प्यावे, असा सल्ला वैद्यकीय पथकाने दिला आहे. मात्र, उपोषण उपकर्त्यांचा उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, जीव महत्त्वाचा आहे, असेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र पाटील यांचा उपोषणकर्त्यांना सांगितले आहे.


फोडा आणि झोडा ही जरांगेंची नीती, लक्ष्मण हाके यांची खोचक टीका

वडीगोद्री येथे ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर खोचक टीका केली. मनोज जरांगे यांना धनगर समाज ओबीसीमध्ये येतो, हे तरी माहिती आहे का,असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला.फोडा आणि झोडा अशी जरांगे यांची नीती असल्याची टीका हाके यांनी केली. ओबीसीचे आरक्षण टिकले पाहिजे, या बाबत धनगर नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे हाके यांनी सांगितले.

भुजबळांना टार्गेट करून धनगरांना जवळ करण्याचा प्रयत्न...

लक्ष्मण हाके म्हणाले, पवार साहेब प्रोफेशनल नेते आहेत. मी त्यांच्या भागातला आहे. किमान त्यांच्या भागातील लोकांनी फोन तरी करायला हवा. पवार साहेब मोठे आहेत. देश पातळीवरचे नेते, त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तरी फोन करायला हवा होता. छगन भुजबळांना टार्गेट करून धनगरांना जवळ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लक्ष्मण हाके यांनी यावेळी सांगितले.

सगे सोयरेची अंमलबजावणी झाल्यास केवळ ओबीसी नाही तर एसी आणि एसटी आरक्षणाला देखील धोका पोहोचेल, असे हाके यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने ओबीसी संपवण्याचा शासनकर्त्याचा घाट असल्याचे दिसत आहे. तुम्ही 12 कोटींचे जनतेचे प्रतिनिधी की एका विशिष्ट समजाचे?? असा सवाल देखील हाके यांनी यावेळी उपस्थित केला. कोणती जात पुढारलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असेही ते म्हणाले.

फुले शाहू पुन्हा जन्माला येणार नाहीत...

लक्ष्मण हाके यांनी या वेळी सांगितले, की फुले शाहू पुन्हा जन्माला येणार नाहीत, आपलं आरक्षण आपल्याला वाचवावे लागणार आहे. लोक नियुक्त सरकार घटनेशी फ्रॉड करत आहे.आम्ही 27टक्के आरक्षणात येतो. धनगर समाज मोठा, म्हणून छोट्या घटकांचे नेतृत्त्व आम्ही करू, त्यामुळे इंग्रजांची तोडा-फोडा ही नीती मनोज जरांगे यांनी सोडावी. शासन जोपर्यंत आम्हाला आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, हे सांगत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार, असेही ते म्हणाले.