Sangli Samachar

The Janshakti News

माधवराव ज्ञानदेव कदम : शुगर आणि बीपी नसलेला शतायुषी बाप..!


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ जून २०२४
स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराजांना तलवार बहाल केलेल्या आई तुळजाभवानीच्या तुळजापूरचे कदम घराणे.. मिरजेला सन १८९५ मध्ये स्थलांतरित आणि पुढे सांगलीत स्थायिक झालेले कदम घराणे.. स्व. वसंतदादा पाटील व डॉ. पतंगराव कदम यांच्यांशी नातं असलेलं घराणं..

या घराण्यातील माधवराव ज्ञानदेव कदम बापू.. २० जून २०२४ ला बापूंच्या वयाची शंभरी पूर्ण..बापूंचा सांगलीच्या खरे क्लब हाऊसमध्ये शताब्दी वाढदिवस... कौटुंबिक आणि सामाजिक मूल्यांचा उत्सव करताहेत अरुणकुमार, प्रा. डॉ. प्रकाश व कदम कुटुंबिय.. या उत्सवात प्रा. डॉ. प्रकाश यांचे जिवलग मित्र जागतिक पातळीवर गाजलेले भौतिक शास्त्रातले विख्यात संशोधक व शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, खासदार विशालदादा पाटील, सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व डॉ. प्रकाशचे काॅलेज मेट मा. पृथ्वीराजबाबा पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्री पाटील व बापूवर प्रेम करणारे कदम कुटुंबिय, नातेवाईक, पै-पाहुणे रावळे, मित्रमंडळी, हितचिंतक यांची उपस्थिती..!

 भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान दिलेल्या लाडांच्या कुंडलमध्ये देशमुख घराण्यातील आत्यांच्याकडे गांधी एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिनिधी हायस्कूल मध्ये स्वातंत्र्याचा सूर्य उगवताना माधवराव बापू मॅट्रिक उत्तीर्ण झाले. शालेय जीवनात १९४२ ते १९४७ या काळात बापू राष्ट्र सेवा दलाच्या संस्काराने मंडीत झाले. १९४८ मध्ये सातारा जिल्ह्यातील गोपूज गावी शिक्षक म्हणून एक वर्ष नोकरीही करुन बेळगाव येथे स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय नोकरीही केली. 

१सप्टेंबर १९५० रोजी दक्षिण सातारा जिल्हा लोकल बोर्डात शिक्षण खात्यात प्रशासकीय सेवेत रुजू होऊन बहुजन समाज शिक्षणाची प्रदीर्घ सेवा करुन सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यात अधीक्षक म्हणून निर्दोष सेवा करुन ३० जून १९८३ रोजी बापू सेवानिवृत्त झाले. या काळात यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, राजारामबापू पाटील,आबासाहेब शिंदे, केशवराव चौगुले, आर. पी. पाटील अण्णा या लोकल बोर्ड चेअरमन राहिलेल्या नेत्यांचा संपर्क होऊन त्यांच्याशी मैत्री झाली. 


माधवराव बापू १जून १९५० रोजी सांगलीत आले. १९५१ मध्ये आक्काताईंशी विवाहबद्ध झाले. आक्काताईनी त्यांना आयुष्यभर खंबीर साथ दिली. खणभागातील कार्लेकर गल्लीत २५ वर्षे बापू भाड्याच्या घरात राहिले. १९७५ मध्ये स्वमालकीचे घर उभे केले.

पुणदीला मामांनी शेती दिली. बापूंना दोन भाऊ.. शेती करणारे.. स्वतःच्या वाटणीची शेती भावांनाच कसायला देणारे बापू मोठ्या मनाचेच.. थोर स्वातंत्र्य सैनिक नागनाथ अण्णा नायकवडी व माजी मंत्री आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्रा. डॉ. एन. डी. पाटील बापूंच्या घरी यायचे.. शिक्षणावर चर्चा व्हायची..झेडपीत येऊन एन. डी. पाटील यांनी बापूंना अलिंगन दिलेली घटना अविस्मरणीय आहे. 

प्रदीर्घ काळ शिक्षण खात्यात नोकरी करुन एक पै देखील त्यांनी गैर मार्गाने मिळवला नाही. शासकीय नोकरी ही जनसेवा आहे. कोणाचीही अडवणूक करु नये.. कोणाचीही संपत्ती हडप करु नये.. दुसऱ्याना भाकर द्या.. कोणाच्या पोटावर मारु नका हा विचार बापूंनी जगून दाखविला. खिशात एक दमडीही नसताना समाधानी कसं राह्यचं हा धडा बापू कडूनच शिकावा. बापू सेवानिवृत्त झाले त्यावेळी त्यांचा बँक बॅलन्स नव्हता. निवृत्त झाले त्यावेळी फंडही शिल्लक नव्हता. मुला बाळांच्या शिक्षण व विवाह कार्यासाठी सारा फंड आधीच बापूनी संपवला होता.. असा अपरिग्रही दीर्घायुषी बाप सगळ्यानाच लाभावा. 
 
शिक्षण खात्यात ३५ वर्षाची सेवा करुन बापूनी कधी गैर मार्गाने संपत्ती मिळवली नाही. पगारात घर चालवणाऱ्या बापूना कधी बँक बॅलन्स करण्याचा मोह झाला नाही. लेकरांचे व नातेवाईकांचे शिक्षण हाच बँक बॅलन्स समजले. अनेकांना नोकऱ्या लावले.. पाहुणे व लेकरांना शिक्षक बनवलं..नातवंडं इंजिनिअर झाले.. नोकरीला लागले. सांगलीत कायम कामानिमित्त येणाऱ्या पाहुण्यांची निवास, भोजन व्यवस्था करायचे. पंचायत समितीत शिवाजीराव देशमुख एज्युकेशनल आॅर्गनायझर म्हणून नोकरीस होते त्यावेळी त्यांच्या बरोबर संपर्क आला. प्राचार्या पी. बी. पाटील यांच्याशी चर्चा व्हायची.. सेवानिवृत्तीनंतर पी. बी. नी त्यांना नवभारत शिक्षण मंडळात दोन वर्षे प्रशासकीय कामासाठी घेतले होते.बापूंचे वसंतदादा पाटील यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते. 

जेष्ठ पुत्र अरुणकुमार यांना त्यांनी पदवीधर केले. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या सांगली हायस्कूल मधून सेवेस प्रारंभ करुन ३५ वर्षे शिक्षक म्हणून बहुजन समाजातील लेकरांना सामर्थ्य दिलं आणि बळवंतराव झेले हायस्कूल मधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. पुत्र प्रा. डाॅ. प्रकाश यांना पदव्युत्तर शिक्षण देऊन प्राध्यापक केलं.. ते लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती कस्तुरबाई वालचंद काॅलेज मध्ये विभागप्रमुख व शेवटी उपप्राचार्य म्हणून निवृत्त झाले. संस्थेने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल केला. सून अनिता या दडगे हायस्कूल मध्ये प्रदीर्घ सेवा करुन पर्यवेक्षक म्हणून निवृत्त झाल्या. नातू अनिकेत व नात आदिती इंजिनिअर झाले. प्रकाश यांच्या पत्नी सुजाता या विशेष सहाय्यक सरकारी वकील व भारत सरकारच्या नोटरी म्हणून विधी क्षेत्रात लक्षवेधी काम करत आहेत. नात सानिका ही इंजिनिअर झाली. बापूंची एक कन्या उषादेवी व जावई डॉ. अमृत पाटील यांचा इस्लामपूरात यशवंत दवाखाना आहे. त्यांची मुलं डॉक्टर झाली.एक कन्या पॅथॉलॉजीस्ट बनली. बापूंची दुसरी कन्या सुषमा.. जावई डॉ. मोहन पाटील नागठाणे हे सिंगापूर स्थित आयएसओ मानांकन देणाऱ्या कंपनीत क्वालिटी कंट्रोल बिझनेस करतात. त्यांना या कामी पुत्र मदत करतो. कन्या एम. बी. ए. आहे. 

दोन कर्तबगार सुसंस्कृत पुत्र, दोन कुटुंबवत्सल कन्या आणि १० नातवंडे, ७परतवंडे अशा कुटुंब कबिल्याचा नायक माधवराव बापू हा खरा बाप माणूस आहे. 

शांत, संयमी बापूना रागावलेलं कधीच पाहिलं नाही असं प्रकाशराव सांगतात. बापूंचं कधीच मोठ्यानं बोलणं नाही..चिडचिड नाही.. अत्यंत समाधानी.. कधीच उंची वस्त्रं.. अलिशान गाडी.. पंचपक्वान्न यांचा हव्यास केला नाही.अन्नाला कधीच नाव ठेवणं नाही. दूध दही व ताक हे आवडीचे. जे ताटात वाढलं ते विनातक्रार आनंदाने खाणारे बापू.. साधी राहणी.. नेहरु शर्ट.. धोतर व गांधी टोपी असा साधा पेहराव असलेले बापू दुसऱ्याचं ऐकून घेतात व चांगला सल्ला देतात. 

वयाची शंभरी पार केलेला शुगर आणि बीपी नसलेला बाप लाभणे हे कदमांचे भाग्य आहे. आजही या वयात ते स्वतः कपडे घालतात. पेपर वाचणं.. विविध राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया देणं हे चालूच असतं. त्यांचा मित्र परिवार मोठा आहे. शिक्षण खात्यात जिल्हाभर काम केल्याने सांगली जिल्ह्य़ातील प्रत्येक गावची माहिती त्यांना आहे.

विठुमाऊलींच्या दर्शनासाठी ते सांगली ते पंढरपूर वारी कायमच करायचे.. शतायुषी माॅर्निंग ग्रुपचे केशवराव चौगुले वकील, गुंडाप्पाण्णा कांते,भाई भगवानराव सुर्यवंशी,विश्वास बापू पाटील, बापूसाहेब खवाटे, भगवान दामाणी, कनुभाई देसाई, बाबूभाई शहा, कांतीलाल कोठारी, रमणिकलाल शहा व किसनभाई लड्डा अशी ही सारी दिग्गज मंडळी आणि बापू दररोज १० किमी चालायचे..चालत मिरजेला जायचे... सकाळचं चालणे, मिरजेला सायकलवरून फेरफटका.. साधा आहार.. समाधानी वृत्ती.. सामाजिक बांधिलकी.. दुसऱ्याचं भलं करणं.. नाती आणि माती जपणं.. मानवतावादी दृष्टी व वागणं.. अपरिग्रही जगणं.. निष्कलंक चारित्र्य.. कर्तव्यदक्ष पणा.. चांगला माणूस म्हणून वागणं यामुळेच माधवराव बापूनी नाबाद शंभरी पार केली याचा आनंद कदमांना तर आहेच आहे परंतु नव्या पिढीला धडे देणारा बापू हा एक प्रेरणादायी ग्रंथच आहे.प्रत्येक घरात बापूसारखा बाप, बापाच्या कष्टांची जाणीव ठेवून बापाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे श्रावणबाळरुपी अरुणकुमार आणि डॉ. प्रकाश सारखे पुत्र, उषादेवी आणि सुषमासारख्या कन्या जन्माला यावेत.. प्रत्येक घरात आई-वडिलांची सेवा करणारे संतान असावीत अशी अपेक्षा व्यक्त करतो व निर्मळ.. निष्पाप मनाच्या बापूंना दीर्घायुरारोग्य लाभो हीच त्यांच्या शताब्दी पूर्ती वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो..! 

प्रा. एन.डी.बिरनाळे
जनसंपर्क अधिकारी
पृथ्वीराज पाटील यांचे यशोधन सेवा व संपर्क कार्यालय सांगली
रविवार दि. २३ जून, २०२४