| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - दि. ३० जून २०२४
आषाढी यात्रा सोहळ्यासाठी संतांच्या पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान सुरू आहे. दरवर्षी हा पायी पालखी सोहळा सर्वसामान्यांना सामावून घेत पंढरीच्या वाटेवर भक्तीत तल्लीन होत आहे. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी मजल दरमजल करत हे पालखी सोहळे दशमीला पंढरीत पोहोचतात. मानाच्या पालख्या वगळता बहुतांश पालख्या, दिंड्या या चंद्रभागेच्या पैलतीरी ६५ एकरांत विसावतात.
त्याठिकाणी प्रतिपंढरपूर वसले जाते. याठिकाणी तंबू, राहुट्या उभारून वारकरी, भाविक विश्रांती घेतात. तसेच भजन, कीर्तन, प्रवचनात भाविक तल्लीन होत असतात. येथे प्रासादिक साहित्य, कृषी साहित्य, संसारोपयोगी साहित्य, नाष्टा सेंटर, चहा टपरी, हॉटेल, खेळणी यांची दुकाने थाटण्यात येत असल्याने आषाढी यात्रा कालावधीत भक्तिसागर येथे प्रतिपंढरपूर वसल्याचे चित्र दिसून येते.
पंढरपूर शहरात होणारी गर्दी लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी चंद्रभागेच्या पैलतीरावर ६५ एकर जागा पालख्या, दिंड्यातील भाविकांच्या निवाऱ्याकरिता उपलब्ध केली. त्यामुळे पंढरपूर शहरात होणारी गर्दी कमी झाली आहे. ६५ एकर या ठिकाणी सुमारे ५०० प्लॉट दिंडी, पालखी धारकांना वास्तव्य करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. या ठिकाणी किमान चार लाख भाविक वास्तव्य करू शकतात. येथून जवळच चंद्रभागा वाळवंट, चंद्रभागा स्नान करण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे भाविकांना ६५ एकर परिसरात वास्तव्य करणे सोयीचे ठरते. प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छता करून भाविकांसाठी प्लॉटस् तयार ठेवले आहेत. चिखल होऊ नये म्हणून मुख्य
प्लॉटसाठी कोणाशी संपर्क साधावा ?
आषाढी यात्रेकरिता दिंडी, पालख्यांसमवेत येणाऱ्या वारकरी भाविकांना भक्तिसागर ६५ एकर येथे तंबू, राहुट्या उभारून निवासाची सोय उपलब्ध करण्यात येते. येथे सुमारे ५०० प्लॉटस्चे वाटप करण्यात येणार आहे. आषाढी एकदशीच्या सोहळ्याअगोदर दिंडी, पालखीतील भाविकांनी प्लॉटसाठी मागणी करावी. याकरिता आपत्कालीन प्रतिसाद केंद्र या ठिकाणी नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे, नायब तहसीलदार प्रवीणकुमार वराडे यांच्याशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
भाविकांना मिळणार या मोफत सेवा
आषाढी यात्रेला येणाऱ्या पालख्या, दिंड्यांमधील भाविकांच्या निवाऱ्याची सोय भक्तिसागर (६५ एकर) येथे केली आहे. मोफत प्लॉट, पिण्याचे शुद्ध पाणी, प्रथमोपचार केंद्र, कायमस्वरूपी व तात्पुरती शौचालये, वीज कनेक्शन, महाआरोग्य शिविर, अन्नपदार्थ शिजवण्यासाठी गॅस वितरण, पोलिस संरक्षण, सीसीटीव्ही आदी सेवा सुविधा या ठिकाणी पुरवल्या जाणार आहेत.
डांबरी रस्त्याबरोबर अंतर्गत रस्ते तयार केले आहेत. जागेचे मुरुमीकरण केले आहे. ठिकठिकाणी नळ पाणीपुरवठा केला आहे. हायमास्ट दिवे, विजेच्या खांबावर एलईडी बल्ब लावल्यामुळे रात्रीच्या अंधारात भक्तिसागर प्रकाशमय दिसतो. आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा १७ जुलैला आहे. यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाने नियोजनाच्या बैठकांवर बैठका घेऊन तयारी सुरू केली आहे. भक्तिसागर येथे ४९७ मोफत प्लॉटस् भाविकांना तंबू, राहुट्या उभारून वास्तव्य करण्यासाठी देण्यात येतात. प्रथम येणाऱ्या पालखी, दिंडी धारकांना प्रथम प्राधान्य देण्याचे धोरण प्रशासनाने राबवले आहे. आषाढी यात्रेला किमान १२ ते १५ लाख भाविक येतात.