Sangli Samachar

The Janshakti News

खा. विशालदादांची वाळवा तालुक्यात एन्ट्री !


| सांगली समाचार वृत्त |
वाळवा - दि. १२ जून २०२४
क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी, क्रांती माता लक्ष्मीबाई नायकवडी तथा आईसाहेब यांच्या बद्दल स्व. प्रकाश बापू पाटील यांच्याकडून अनेक वेळा स्वातंत्र्यपूर्व काळातल्या घटना आणि स्वातंत्र्यानंतरच्या अनेक घटना ऐकल्या आहेत. आज त्यांना अभिवादन करताना निश्चितच आनंद होत आहे. वैभव काका नायकवडी हे जेष्ठ आहेत. या पुढील काळात त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे, व हा ऋणानुबंध असाच पुढे कायम चालवावा. अशी अपेक्षा व्यक्त केली. असे प्रतिपादन खा. विशालदादा पाटील यांनी केले.

येथील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर खासदार विशालदादा पाटील यांचा हुतात्मा संकुलाच्या वतीने वैभवकाका नायकवडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खासदार विशाल पाटील यांनी क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णांच्या समाधीला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. सांगलीच्या खासदारांनी वाळवा तालुक्यात यानिमित्ताने एन्ट्री केली असून, तालुक्यातील किंबहुना जिल्ह्यातील नव्या राजकारणाची सुरुवात यानिमित्ताने झाली असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात होत आहे.


यावेळी बोलताना वैभवकाका म्हणाले की, पद्मभूषण क्रांतिवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी आणि वसंतदादा पाटील यांचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून अखेरपर्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. खासदार विशाल दादा पाटील यांच्या रूपाने सांगली जिल्ह्याला कर्तृत्ववान खासदार मिळाले आहेत नायकवडी आणि पाटील घराण्याचे ते जिव्हाळ्याचे संबंध घेऊन पुढे वाटचाल करूया, असे आवाहन हुतात्मा संकुलाचे नेते वैभव काका नायकवडी यांनी केले.

कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव भाऊ नायकवडी, वीरधवल नायकवडी, कारखान्याचे व्हा चेअरमन रामचंद्र भाडळकर, सर्व विद्यमान व माजी संचालक, हुतात्मा संकुलातील कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौरव भाऊ नायकवडी यांनी शेवटी आभार मानले.