| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ८ जून २०२४
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांना एनडीएचे नेते म्हणून प्रस्ताव मांडण्यात मंजूर करण्यात आला. तसेच एडीएतील घटक पक्षाने या प्रस्तावाला समर्थन दिले. दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी भाषण करताना सर्व घटकपक्षाचे अभिनंदन केले. यादरम्यान काही रंजक किस्से घडले. हे किस्से सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर या बैठकीतील काही व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहे. या बैठकीनंतर अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींची भेट घेण्याकरता अनेक नेत्यांची रांग लागली होती. या वेळी काही नेत्यांनी इतर दिलेलेच बुके पुन्हा नरेंद्र मोदींच्या हाती ठेवले. यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचाही व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याकरता उपमुख्यमंत्री अजित पवार उभे होते. अजित पवार यांनी नरेंद्र मोदींची भेट घेत त्यांना पुप्षगुच्छ दिला. यावेळी मोदींनी हा बुके घेत मागे उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या हाती दिला. यावेळी सुरक्षा रक्षकाने तो पुष्पगुच्छ मागे असलेल्या त्याच्या सहकाऱ्याच्या हातात दिला. त्याचवेळी महादेव जानकर उभे होते. त्यांनी तोच बुके घेत पुन्हा नरेंद्र मोदींना देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. नेमका हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओंवर तुफान प्रतिक्रियाही येत आहेत. विरोधकांनीही हा व्हिडिओ शेअर करत जानकर यांना ट्रोल केले आहे. महादेव जाणकारांनी अजित पवारांचा बुके चोरला अन् मोदींना दिला असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आता व्हिडिओ शेअर करत टीका केली आहे.