| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ११ जून २०२४
बिहारच्या सर्वाधिक महत्त्वाच्या जागांपैकी एक असलेल्या पूर्णिया येथून अपक्ष लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पप्पू यादव पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचले. त्यांनी आज काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची भेट घेतली आहे. या लोकसभा निवडणुकीत पप्पू यादव यांना काँग्रेसकडून तिकीट हवे होते, मात्र महाआघाडीतील जागावाटपाच्या अंतर्गत पूर्णियाची जागा लालू यादव यांच्या पक्ष आरजेडीकडे गेल्यानंतर पप्पू यादव यांना काँग्रेसकडून तिकीट मिळू शकले नाही.
मात्र त्यानंतर पप्पू यादव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती आणि आता विजयाची नोंद करून ते चौथ्यांदा पूर्णियाचे खासदार झाले आहेत. यानंतर आज पप्पू यादव यांनी दिल्ली गाठून प्रियंका गांधी यांची भेट घेतली. यातच अपक्ष खासदार पप्पू यादव हे पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, तसं झाल्यास लोकसभेत काँग्रेसचं संख्याबळ वाढले. प्रियंका गांधी यांची भेट घेल्यानंतर पप्पू यादव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यात ते म्हणाले की, ''देश आणि बिहारच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. आमचं आता एकच संकल्प आहे, यावेळी शतक पार, पुढील वेळी काँग्रेस बहुमत पार, बनवायची आहे इंडिया आघाडीची मजबूत सरकार, वंचित आणि गरिबांसाठी हिरो राहुल गांधी पंतप्रधान होतील.''
अपक्ष म्हणून निवडणूक लढल्यानंतरही पप्पू यादव यांनी संपूर्ण निवडणूक प्रचारात काँग्रेस किंवा पक्षाच्या नेत्यांविरोधात एक शब्दही बोलले नाही. ते म्हणाले होते की, ते काँग्रेसच्या विचारसरणीच्या जवळ आहेत. दरम्यान, याआधी निवडणूक जिंकल्यानंतर एक मुलाखतीत त्यांनी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांना लक्ष केलं होतं. ज्यात ते म्हणाले होते की, ''बिहारच्या युवराजांना अहंकार नसता तर महाआघाडीला 25 जागा मिळाल्या असत्या.'' तसेच बिहार आणि दिल्लीमुळे राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकले नाही, असंही ते म्हणाले होते.