yuva MAharashtra ४०० पार बरोबरच भाजपाचं आणखी एक स्वप्न भंगलं !

४०० पार बरोबरच भाजपाचं आणखी एक स्वप्न भंगलं !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ जून २०२४
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. मात्र भाजपाचं हे स्वप्न पूर्ण झालेलं नाही. ५४३ पैकी २९२ जागा या एनडीएला मिळाल्या आहेत. तर भाजपाला २४० जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरत भाजपाने यश मिळवलं आहे. मात्र २०१४ आणि २०१९ प्रमाणे या पक्षाने क्लिन स्वीप मारलेली नाही. अशात भाजपाचं आणखी एक स्वप्न भंगलं आहे.

इंडिया आघाडीची एनडीएला टक्कर

काँग्रेस पक्षाने ९९ जागा जिंकल्या आहेत तर इंडिया आघाडीने २३२ जागांवर विजय मिळवला आहे. इतर जागांवर १९ उमेदवारांचा विजय झाला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपाला अपेक्षित होते तसे मुळीच लागलेले नाहीत हे वास्तव आहे. इतकंच काय तर भाजपाला एकट्याच्या जिवावार बहुमताची संख्याही गाठता आलेली नाही. राजकीयदृष्ट्या हा भाजपाचा पराभव आहे असं विरोधक म्हणत आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे भाषण केलं त्या भाषणात त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेऊ असा दावा केला आहे.


भाजपाचं ४०० पारचं स्वप्न भंगलं

लोकसभा निवडणुकीत भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. निवडणूक संपल्यानंतर १ जून रोजी जे एक्झिट पोल समोर आले त्यातही ४०० पारचं स्वप्न पूर्ण होताना दिसत नव्हतंच. मात्र भाजपाच्या नेत्यांनी विश्वास व्यक्त केला होता की आम्ही एनडीएसह ४०० पार जाऊ. प्रत्यक्षात निकालाच्या दिवशी हे स्वप्न भंगलं. एवढंच नाही तर भाजपाचं आणखी एक स्वप्न भंगलं आहे. ते स्वप्न आहे काँग्रेसमुक्त भारताचं.

काँग्रेसमुक्त भारताचं स्वप्न भंगलं

काँग्रेसमुक्त भारत हा नारा नरेंद्र मोदींनी २०१४ पासून दिला होता. मात्र २०१४, २०१९ आणि २०२४ या तिन्ही निवडणुकांमध्ये भारत काँग्रेसमुक्त झालेला नाही हे वास्तव आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या आहेत. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी काँग्रेसने चांगल्या जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसमुक्त भारत हे भाजपाचं स्वप्नही भंगलं आहे.

महाराष्ट्रात भाजपाचे खासदार २३ वरुन ९ वर, काँग्रेस १३ खासदार

२०१९ मध्ये भाजपाचे २३ खासदार निवडून आले होते. मात्र यावेळी ही संख्या थेट ९ वर आली आहे. भाजपाचं महाराष्ट्रात मोठं नुकसान झालं आहे. तर काँग्रेसचे १३ खासदार २०२४ मध्ये निवडून आले आहेत. महाराष्ट्रातली ही संख्या २०१९ मध्ये अवघी एक होती. एका जागेवर काँग्रेसला यश मिळालं होतं. मात्र त्यात मोठा बदल झाला आहे हे २०२४ च्या निकालाने दाखवून दिलं आहे. भाजपाच्या डोळ्यांत हा निकाल अंजन घालणारा ठरला आहे.