yuva MAharashtra शोध दूर आकाशातील सावलीचा ! (✒️राजा सांगलीकर)

शोध दूर आकाशातील सावलीचा ! (✒️राजा सांगलीकर)

सांगली समाचार वृत्त |
बंगळुरु - दि. २९ जून २०२४
आजचा दिवस एकदम खराब, अत्यंत वाईट. सकाळी उठल्यापासून डोक्याला ताप. उठल्या-उठल्या कुणाचे तोंड पाहिले होते कुणास ठाऊक ? ऑफीसमधून घरी परत जाताना माझ्या मनात विचारांचे वादळ उठले होते. 

त्याचे काय झाले, माझी आई दररोज सकाळी लवकर उठून तिच्या नातीला म्हणजे माझ्या मुलीला शाळेत सोडायला जाते. पण आज सकाळी कां कुणास ठाऊक; ती बिछान्यातून बाहेर यायलाच तयार नव्हती. त्यामुळे डोळ्यांमध्ये प्रचंड झोप असुनही झोपमोड करून मला नाईलाजाने लवकर उठायला लागलं.  

बरं, माझी कारटी, ती तरी सरळ आहे कां? सारखा कांही तरी उपद्व्याप करत असते, उलट-सुलट वागत असते. आज सकाळी शाळेला जायचे वेळी तर तिने अगदी कहर केला. मग रागाच्या भरात मी दिला एक तडाखा ठेऊन तर; माझे कांही चुकले कां? पण नाही. तिची आई, म्हणजे माझी पत्नी माझ्या मुलीला समजाऊन सांगायच्या ऐवजी उलट मलाच कांहीतरी अदात्वदा बोलू लागली. 

मग रागाच्या भरात मीही तिला दोन शब्द सुनावले. भरीत भर, आमचा हा सगळा वितंडवाद ऐकून बाबा, ध्यान-धारणा सोडून आले व माझ्या पत्नीचे बोलणे कमी म्हणून की काय, लागले मला तत्वज्ञान शिकवायला 

“अरे, शांतपणे घे, साध्या-साध्या गोष्टींवरून कशाला एवढं चिडतोस, रागावतोस.......”, 

आता बाबांना कांही मी उलट बोलू शकत नाही. मग काय करायचं, बसलो गप्प, मनातल्या मनात चडफडत. काय करणार दुसरं?


मी दिवसभर राब-राब राबतो, कष्ट करतो, खूssप थकून जातो, ते काय फक्त माझ्या एकट्याच्या सुखासाठी ? या सर्वांच्या सुखासाठीच नां? पण, माझ्या सुखाचा कुणी विचारच करत नाहीत. सारेजण फक्त आपल्या सोयीचा, सुखाचा विचार करतात. 
  
आता आमचे ऑफीस... आणि त्यातला तो हिटलर. पोहचायला पांच मिनीट उशीर झाला की अशा कुत्सित नजरेने बघतो की वाटतं, ‘बाबारे, पाहिजे तर चार शिव्या दे, मेमो दे, पण असं बघू नकोस.’ कामात क्षुल्लकशी चुक झाली, एखादे स्टेटमेंट किंवा एखादा रिपोर्ट द्यायाला थोडासा वेळ झाला की झालं, हा गृहस्थ सारं ऑफीस डोक्यावर घेणार. 

बरं आमचे सहकारी, मित्र, तेही फक्त पार्टी, हा-हू, चेष्टामस्करी, माझ्याकडे पैशाची उसनवारी करायची एवढ्यापुरतेच मर्यादित. माझ्या अडचणीच्या वेळेला कुणीकुणीही मला मदत करत नाहीत.

कंटाळा आला आहे मला या सा-याचा, या जीवनाचा. वाटत हे सारं सोडून दूर कुठंतरी जाऊन एकटच शांsत बसावं. हं ! एक मोठासा उसासा मी टाकला. सालं, पण ते ही शक्य नाही. माझं नशीबच फुटकं आहे. माझ्या मनात नैराश्य, बेचैनी, राग, कटुता, चिढ, सारे एकदम दाटून आले. मला घरी परतावसे वाटेना. काय करायचे आहे घरी परतून? थोड्या फार फरकाने तेच ते रहाटगाडगे. काय करावे? हताश होऊन मला रडू येऊ लागले.  

डोळ्यात जमलले पाणी कसेबसे टिपून मी कार रस्त्याच्या कडेला थांबवली. कारचे इंजीन बंद केले. कारच्या बाहेर आलो आणि फुटपाथवर असलेल्या लगतच्याच एका बाकावर खिन्न मनाने बसलो. माझ्या लगतच्या बाकावर एक व्यक्ति वाचत बसली होती अन् वाचताना स्वतःशीच बडबडत होती. त्या व्यक्तिच्या बोलण्याचे कांही शब्द माझ्या कानांवर पडले.
 

वादळाला भिऊन नको थांबू तू पथिका ।
वादळ येत असते अन् जात असते ।।
फिरते हे वादळाचे जाते अगणित घटिका ।
हवी जी सावली चाल रूकता मिळेल कशी ।।
चालणे आवश्यक तुझला ।
मिळण्या दूर आकाशातील सावली ।।
दूर आकाशातील सावली .....

कवितेचे हे शब्द ऐकल्यावर माझ्या मनात सहज एक विचार चमकलाः या कवितेच्या ओळी माझ्या मनातील विचारांच्या वादळाला, माझ्या मानसिक स्थितीला उद्देशून तर नाहीत नां ?  मनामध्ये हा विचार येताच त्या व्यक्तिचे काव्य वाचन मी कान टवकारून ऐकू लागलो. 

जीवन प्रवाह अवखळ आहे खरा ।
पण असतो त्याला नेहमी किनारा ।।
इंद्रधनु आशेच्या नौकेवर जो पथ चाली ।
मिळेल त्याला दूर आकाशातील सावली ।।
दूर आकाशातील सावली .....

कवितेच्या या ओळींनी माझ्या मनाला कौल दिला. नक्की, नक्कीच, ही कविता, या कवितेतील शब्द माझ्या मानसिक स्थितीचे वर्णन आहे. मनामध्ये विचारांची शृंखला सुरू झालीः माझ्या जीवनामध्येही आज बेचैनीचा, असमाधानाचा एक प्रवाह वाहत आहे. पण त्याला सुखाचा, समाधानाचा किनारा कुठे आहे? विचारांचा कोळी दुःखाचे, नैराश्याचे, नकारार्थी विचारांचे जाळे परत एक वेळ मनामध्ये विणु लागला. 

त्या व्यक्तिचे कविता वाचन पुढे चालू होते. 
वादळ वा-याची वाट आहे ही काट्याकुटयाची ।
पण सांभाळी सदैव आपल्याला एक साथी ।।
दुःखाचा काळोख पसरता, उजळवी जो दाही दिशा ।
समजता हे तूजला झटकून टाक दुःख, निराशा ।।
नकोस भिऊ, नकोस थांबु ।
मिळण्या दूर आकाशातील सावली ।।
दूर आकाशातील सावली ....

त्या व्यक्तिचे काव्य वाचन संपले व ती उठून आपल्या मार्गावर चालू लागली. कवितेतील प्रत्येक शब्दावर मी विचार करू लागलो. माझ्या मनातील विचार बदलू लागले. नैराश्य, बेचैनी, राग, कटुता, चिढ, नकारार्थी विचारांचे वादळ हळुहळु नमु लागले आणि....
 
माझ्या कानांवर आवाज आला, 
“साहेब, चणे, फुटाणे, गोडे, खारे, मसाल्याचे शेंगदाणे कांही देऊ कां ? ताजे व छान आहेत.”

मी मान वर करून पाहिले. चणे, फुटाणे, शेंगदाणे विकणारा एक माणूस माझ्या पुढ्यात उभा होता. मी होकारार्थी मान हालवत सांगितले,

“पाच रुपयांचे खारे शेंगदाणे ”. 

टोपलीत रचलेल्या कागदाच्या कोनांतील एका कोनात त्यांने मापाने शेंगदाणे ओतले व तो कागदाचा कोन माझ्यापुढे केला. शेंगदाण्यांने भरलेला कागदाचा कोन त्याच्या हातातून घेत त्याला देण्यासाठी मी पाकीटातून पन्नास रुपयांची नोट काढून पुढे केली आणि....... 

मी सुन्न झालो. त्या माणसाच्या शर्टाची एक बाही पूर्ण मोकळी होती, वा-यावर फडफडत होती. मी दिलेल्या पन्नास रुपयांची नोट घेण्यासाठी त्याला दुसरा हात नव्हता. त्यांने पुढे केलेल्या त्याच्या एकुलत्या एका हातातून मी शेंगदाण्याचा कोन घेतल्यावर सराईतपणे त्यांने आपल्या त्या एका हाताने मी पुढे केलेली पन्नास रूपयांची नोट घेतली व टोपलीतील एका डब्यातून पंच्चेचाळीस रुपये काढले व मला दिले.

माझ्या चेह-यावरील भाव ओळखून तो म्हणाला, “साहेब, दहा वर्षांपुर्वी एका मोठ्या अपघातात एक हात व सारे कुटुंब, दोन्ही गमावले. नोकरीही गेली. एक भल्या माणसाच्या मदतीने हा व्यवसाय सुरू केला, त्यातून एकट्या जीवाला जगण्यासाठी पुरेसे पैसे मिळतात. ही त्या भगवंताची कृपा. संत तुकाराम महाराज सांगून गेले आहेत, ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान ” शेंगदाणे विकणारा तो माणूस निघून गेला.

 आणि माझ्या मनातील ‘तो’ नेहमीचा कोपरा अवतीर्ण होऊन मला म्हणाला, 

“राजा समजलं, रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्या मनाविरूद्ध, इच्छेविरूद्ध लहानसहान घटना नेहमी घडत असतात. त्यामुळे आपल्याला वाईट वाटणे, नाराज होणे साहजिक आहे. पण लक्षात ठेव अशा लहानसहान घटनांचा बाऊ करून आपले जीवन दुःखी बनवायचे नाही. इतरांना असलेल्या मोठ्या दुःखाचा विचार करायचा, आणि आपल्या मनाविरूद्ध, इच्छेविरूद्ध झालेल्या लहान घटनांकडे दुर्लक्ष करायचे, त्यांना विसरून जायचे. भूतकाळात होऊन गेलेल्या घटनांमुळे दुःखी होऊन आपला आजचा वर्तमान व येणारा भविष्यकाळ दुःखी बनवायचा नाही."

"राजा, थोडा विचार कर, त्या शेंगदाणेवाल्याने काय आणि किती गमावले आहे आणि तुझ्या जवळ काय आहे. निरोगी प्रकृती, आई, वडील, पत्नी, भावंडाची माया, प्रेम, मित्रांचे सहकार्य, चांगली आर्थिक स्थिती ? तुझ्या जवळ जे कांही आहे त्याबद्दल परमेश्र्वराचे मनोमन आभार मान आणि मग बघ तूला हवी असलेली ‘सावली’, तुझे सुखी, समाधानी, आनंदी जीवनाचे इच्छित,  तूझ्यापासून कधीही दूर, ..... दूर असणार नाही.”

एवढे बोलून माझ्या मनातील ‘तो’ कोपराही जिथून आला होता तिथे परतला.
‘दूर आकाशातील सावली’ कवितेतील शब्द, आपला एक हात, सर्व कुटुंब, नोकरी, सर्वस्व गमावलेले असूनही समाधानात राहणारा तो शेंगदाणेवाला आणि माझ्या मनातील ‘तो’ कोपरा शब्दांत न बांधता येणारे खुपसे कांही मला सांगून गेले आणि तोंडामध्ये टाकत असलेल्या खरपूस भाजलेल्या खा-या शेंगदाण्यांचा स्वाद मला अमृतासमान वाटला. 

कारमध्ये परतुन मी कार सुरू केली, माझ्या जवळच असलेल्या सावलीकडे, माझ्या घराकडे, समाधानाचे, आनंदाचे, सुखाचे जीवन जगण्यासाठी. 

- आजचे बोल अंतरंगाचे पुर्ण
संदर्भ. १. कविता लेखन आधार ‘दूर गगनकी छाँव में’ या हिंदी सिनेमातील स्व. शैलैन्द्र लिखीत गीत ‘राही तू मत रूक जाना’