| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १२ जून २०२४
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यात १५ जूनपासून 'एक राज्य एक गणवेश' योजना लागू करण्यासाठी आदेश जारी केले आहेत. याबाबत विस्तृतपणे शासन निर्णय जारी करण्यात आला असून, योनजेच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले आहे. राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित सर्वच शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 'एक राज्य एक गणवेश' योजना लागू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जाणार आहे. याबाबत राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून नुकताच शासन निर्णय (जीआर) करण्यात आला असून, यात आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
असा आहे गणवेशाचा तपशील ?
नियमित गणवेश -
इयत्ता पहिली ते चौथी (मुली) : आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक.
इयत्ता पाचवी (मुली) : आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट
स्काऊट गाईडसाठी -
इयत्ता पहिली ते पाचवी (मुली) : गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक.
इ.6 वी ते इ.8 वी मुली आणि इ.1 ली ते इ.8 वी मुली (उर्दू माध्यम)
नियमित गणवेश : आकाशी निळ्या रंगाची कमीज, निळ्या गडद रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी.
स्काऊट गाईडसाठी : गडद आकाशी निळ्या रंगाची कमीज, गडद निळ्या रंगाची सलवार व गडद निळ्या रंगाची ओढणी.
इयत्ता पहिली ते सातवी (मुले) : आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट (नियमित गणवेश)
स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट (स्काऊट गाईडसाठी)
इयत्ता आठवी (मुले) : आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट (नियमित गणवेश)
स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पॅन्ट (स्काऊट गाईडसाठी)
कोणत्या दिवशी कोणता गणवेश ?
राज्य सरकारच्या एक राज्य एक गणवेश या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत नियमित गणवेश आणि स्काऊट गाईडसाठीचा गणवेश देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या जीआरमध्ये विद्यार्थ्यांना सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश तर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी स्काऊट गाईडसाठीचा गणवेश परिधान करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
किती आहे गणवेशाची किंमत ?
राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून सुरु होत आहेत. महिला बचत गटामार्फत सध्या गणवेशाची शिलाई सुरु आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या स्काऊट गाईडच्या गणवेश शिलाईसाठी १०० रुपये खर्च आणि १० रुपये अतिरिक्त अनुषांगिक खर्च असा एकत्रितपणे जवळपास 110 रुपये प्रति विद्यार्थी खर्चाची रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडून देण्यात यावी, असेही शिक्षण विभागाच्या जीआरमध्ये म्हटले आहे.