Sangli Samachar

The Janshakti News

"जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही, मला टोकाला जायला लावू नका", विशाल पाटील अन् कदमांना इशारा


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ जून २०२४
लोकसभेतील कुस्तीचा आखाडा गाजवल्यानंतर खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री, विश्वजीत कदम यांच्यात 'कॉन्फिडन्स' आला आहे. विशाल पाटील आणि कदम यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन अप्रत्यक्षपणे आव्हान दिलं आहे. विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी ललकारल्यानंतर जयंत पाटील यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. समर्थकांनी रिल्समधून विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांना इशारा दिला आहे.

रिलमध्ये काय?


जयंत पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एक रिल व्हायरल केलं आहे. त्यात जयंत पाटील यांचा आवाज आणि काही क्लिप्स लावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जयंत पाटलांनी म्हणतात, "जयंत पाटील गोड बोलतात, पण जयंत पाटलांचा विरोध तुम्ही अजून बघितलेला नाही. मला त्या टोकाला जायला लावू नका. आहे ते सगळंच गमवाल एवढंच सांगतो." हे रिल व्हायरल झाल्यानंतर भर पावसाळ्यात सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण कडक उन्हाळ्यासारखं तापलं आहे.

विशाल पाटील अन् विश्वजीत कदम काय म्हणाले?

यापुढं इस्लामपूर-वाळवा मतदारसंघाव देखील आपलं दसपटीनं लक्ष राहील आणि मतदारसंघात आता नवीन निर्णय घ्यावे लागतील, अशा शब्दांत विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी जयंत पाटील यांच्या इस्लामपूर-वाळवा मतदारसंघातल्या कसबे-डिग्रज येथे झालेल्या समारंभातून अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.

"इस्लामपूर मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार"

विशाल पाटील म्हणाले, "विश्वजीत कदम आघाडीत असल्यामुळे काही बोलू शकत नाहीत. पण, मी अपक्ष खासदार असल्यानं काहीही करू शकतो. आपण दिल्लीत काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. पण, अपक्ष खासदार म्हणून इस्लामपूर मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार आहे. या मदरासंघातील सगळ्यांची मोट बांधण्याची जबाबदारी माझी आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातल्या गावांचा सत्कार व्हायचा असताना, तुमच्या गावात येऊन सत्कार स्वीकारतोय,यावरुन तुम्ही ओळखले पाहिजे आहे, पुढची दिशा काय असणार आहे आणि काय राहिले पाहिजे."

दहा पटीनं लक्ष देऊ

"आम्ही सर्व खंबीरपणे कसबे डिग्रज मधल्या जनतेच्या पाठीशी आहोत. कसबे डिग्रजवर जेवढे लक्ष आमचं नव्हते, त्याच्या दहा पटीने येणाऱ्या काळात लक्ष देऊ," असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.