| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १७ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात 2019 च्या तुलनेत चांगलं यश मिळालं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतरही जागांमध्ये वाढ झाली. आता लोकसभेनंतर आता मविआकडून विधानसभा निवडणुकीच्या हालाचाली सुरू केल्या आहेत. अद्याप विधानसभा निवडणुकीला चार महिन्यांचा अवधी आहे. मात्र त्याआधी मविआने वाद टाळण्यासाठी जागावाटप लवकर पूर्ण करण्याचं ठरवलंय. मविआचा जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चाही झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेआधी तीन प्रमुख पक्षांची जागावाटपासाठी प्राथमिक बैठक झाली. विद्यमान आमदारांशिवाय इतर कोणत्या जागांवर कोणता पक्ष लढेल, कोणाची ताकद जास्त आहे याची चाचपणी प्रत्येक पक्षाकडून केली जाणार आहे.
काँग्रेसची ताकद विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातला काही भाग आणि मुंबईतल्या काही भागात आहे. तिथं त्यांना जास्त जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस सर्वाधिक 100 ते 105 जागांवर निवडणूक लढू शकते. तर ठाकरे गटाची ताकद कोकण, मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये आहे. त्यांच्या वाट्याला 90 ते 95 जागा येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची ताकद पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागात आहे. त्याठिकाणी राष्ट्रवादीला जास्त जागा मिळू शकतील. शरद पवार गटाला जागावाटपात 80 ते 85 जागा मिळू शकतात.
लोकसभा निवडणुकीत मविआमध्ये सांगलीच्या जागेवरून बरीच खडाजंगी झाली. काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि मविआचा अधिकृत उमेदवार ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला. आता विधानसभेला अशा चुका टाळण्याचा प्रयत्न मविआचा असणार आहे. लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने सर्वाधिक 21 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यांना 9 जागा जिंकता आल्या. तर काँग्रेसने 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवला होता.