Sangli Samachar

The Janshakti News

थेंबे थेंबे तळे साचे हे खरे पण ..... (✒️ राजा सांगलीकर)


सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ जून २०२४
शहरातील गजबलेल्या रस्त्यावर फुटपाथला लागून ब-याच वर्षांपासून माझे छोटेसे दुकान. माझ्या दुकानाशेजारील आजुबाजुचे दुकानदार, फुटपाथवर उभे राहून मालाची विक्री करणारे किरकोळ विक्रेते व तेथून नेहमी जाणा-या येणा-या लोकांशी माझा परिचय आणि त्यातील कांही परिचयांचे रूपांतर मैत्रीमध्येही. अशा परिचयातून बनलेला माझा एक घनिष्ट मित्र – सुमन. सुमन, माझ्या स्मरणात चांगला राहण्याचे व परिचयाचे रूपांतर घनिष्ट मैत्रीत होण्याचे कारण एक लहानशी घटना, त्यावर आम्हा दोघांचे संभाषण व त्यातून कांहीतरी महत्वाचे मी शिकलेलो.

ही घटना घडल्याला आता कांही वर्षे लोटली आहेत. दररोज संध्याकाळी ऑफीसमधून घरी परतणा-या सुमनला मी माझ्या दुकानातून पाहत असे. दर गुरूवारी संध्याकाळी घरी परततांना सुमन माझ्या दुकानापुढील फुटपाथवर फुले, फुलांचे हार विकणा-या लहान मुलां-मुलींकडून थोडी फुले व हार विकत घेई. माझे दुकान फुटपाथ लगतच असल्यांने त्या लहान मुलां-मुलीशी सुमनचे चालणारे संभाषण कितीतरी वेळ मला ऐकु येत असे. 
एका गुरूवारी संध्याकाळी नेहमी प्रमाणे सुमन; फुले व फुलांचा हार घेण्यासाठी ५–६ वर्षे वयाच्या एका छोट्या मुलीजवळ थांबला. त्या मुलीजवळील पांढ-याशुभ्र टपो-या मोग-याच्या फुलांचा मंद वास मनाला प्रसन्न करत होता. “मुली, केवढ्याला दिलीस फुलांची माळ?” सुमनने त्या मुलीला विचारले. 

“चार रुपयांना एक हात” कोपरापर्यंतचा हात माप म्हणून त्या मुलीने दाखवला.

“ठिक आहे दे दोन हात” सुमनने सांगितले. 
त्या मुलीने आपल्या हाताच्या मापाने दोन हात माळ कापली व कागदामध्ये बांधून सुमनच्या हातात दिली. 

“अंकल, ही राहिलेली एक हातापेक्षा थोडी जास्त असलेली माळ फक्त शिल्लक राहीली आहे. ती पण घ्याकी. चार रूपयांमध्येच तुम्हाला ही जास्तीची माळ मी देते” एखाद्या मुरलेल्या व्यावसायिकाच्या अविर्भावात ती चिमुरडी म्हणाली. 

“ठिक आहे, दे ती ही” सुमनने त्या मुलीला सांगितले. त्या मुलीने राहिलेली माळ कागदामध्ये बांधून सुमनला दिली व सुमनने दिलेले बारा रूपये घेऊन आनंदाने उड्या मारत आपल्या घराच्या दिशेने धुम ठोकली. 

फुलांच्या माळेचे पुडके घेऊन सुमन माझ्या दुकानांत कांहीतरी खरेदीसाठी आला. त्यांने मागितलेली वस्तु त्याला बांधून दिली व पैसे घेऊन झाल्यावर...

“सुमनजी, तुम्ही गैरसमज करून घेणार नसाल तर कांही बोलु कां?” मी जरा भीतभीतच सुमनला विचारले. 

“राजाभाऊ, कांही सांगण्यासाठी परवानगी कशाला मागता? निःसंकोचपणे बोला. माझे कांही चुकत असेल तरी स्पष्टपणे सांगा. माझा गैरसमज व्हायचा नाही. माझ्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी उपयोगच होईल” सुमनने मला म्हटले...

“नाही, म्हणजे काय आहे, दर गुरूवारी तुम्ही जाणीवपुर्वक या लहान मुलां-मुलींकडून फुलांची माळ विकत घेता. फुले, फुलांच्या माळा विकणारी ही मुलं दिसायला लहान आहेत पण, ती फार चलाख आहेत. ते सारेजण प्रत्येकवेळी तुम्हांला फसवतात. आता आजचेच उदाहरण घ्या. एक तर माळ मापतांना आपल्या लहान हातानी ते माळ मापतात. त्यामुळे अन्य विक्रेत्यांच्या मानाने छोटी माळ मापली जाते. दुसरे म्हणजे तुम्ही घासाघिस न करता त्यांनी सांगितलेल्या दरात माळ विकत घेता. आज तुम्ही ज्या माळेसाठी बारा रुपये दिलेत, ती थोडीशी घासाघीस केली असता नऊ-दहा रुपयांना त्या मुलीने तुम्हाला दिली असती. तुमची संमती असेल तर पुढील गुरूवारपासून योग्य दरात फुलांची चांगली माळ मी तुमच्यासाठी विकत घेऊन ठेवीन. तेवढीच तुमच्या पैशांची बचत. अशा वाचलेल्या एक-दोन रुपयांच्या थेंबा-थेंबातूनच मोठ्या रक्कमेचे तळे बनु शकते नाही कां?” माझ्यातला पक्का व्यापारी; सुमनला म्हणाला.

“राजाभाऊ, या लहान मुलां-मुलीकडील घेत असलेली फुलांची माळ कमी मापाची असते, एखादा रूपया कमीजास्त दरात ती मला विकतात, हे मला माहिती आहे. पण मी या लहान मुलांमुलींकडूनच फुले, फुलांची माळ विकत घेतो, त्याला कांही कारणं आहेत. आता असं बघा, मी ज्यावेळी या लहान मुलांमुलींना त्यांच्याकडून घेतलेल्या माळेचे पैसे देतो त्यावेळी त्यांच्या डोळ्यांत एक चमक, एक आत्मविश्वासाचे भाव असतात. मुख्य म्हणजे त्यांचे डोळे हर्षाने, आनंदाने अक्षरशः थुई-थुई नाचत असतात. त्यांचा तो हर्ष, आनंद पाहून मलाही खुप आनंद होतो. शिवाय कष्ट करून जगण्यासाठी धडपडणा-या त्या कुटुंबाला अत्यल्पशी मदत केल्याचे एकप्रकारचे आत्मिक समाधानही मला मिळते. 

या सा-यातून मला जो निर्भेळ आनंद मिळतो त्याची किंमत; माझ्या त्या एक-दोन रूपयापेक्षा अनंतपटीने जास्त आहे. खरं तर, एक-दोन रूपये जास्त देऊन व कमी मापाची माळ घेऊन, व्यापारी भाषेत बोलायचे तर, अल्पसे नुकसान सोसून मी माझ्या जास्त फायद्याचा व्यवहार करत असतो. एखाद्या गोष्टीची, कृत्याची पूर्ण माहिती घेऊन जर आपण ती करत असलो तर आपण फसवले गेलो, जात आहोत असे म्हणता येईल कां ? राजाभाऊ, जीवनामध्ये मोठा बदल घडवणा-या घटना क्वचित कधीतरी घडत असतात. जीवनाचे वस्त्र विणले जाते त्यातील लहान-लहान क्षणांनी आणि तशाच लहान घटनांनी, त्यातील कांही सुखाच्या, कांही दुःखाच्या. कांही क्षण, घटना तलम, मखमली, तरल तर कांही रूक्ष, कठीण, कठोर. जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला घडणा-या या लहान, लहान घटनांतून आनंद मिळवता आला की जीवन आनंदी होते, मनामध्ये तृप्ती, सुख, समाधानाची साठवण होते अन् जीवन बनते 

आनंदाच्या लहरींनी भरलेल्या मधुर आठवणींचे सुरेल तळे. तसे तूमचे म्हणणे; थेंबे थेंबे तळे साचे मला मान्य आहे. तळे साठवायचे हेही खरे, पण कोणत्या थेंबांचे? दैनंदिन जीवनातील मनस्तापाच्या, मनातल्या मनात कुढण्याच्या, नैराश्याच्या घटनांच्या थेंबांचे कि आनंदाच्या, समाधानाच्या छोट्या-छोट्या घटनांच्या थेंबांचे हे आपण ठरवायचे. नाही कां?” मला प्रश्न करून सुमन निघून गेला. 

आणि माझ्या मनातील ‘तो’ नेहमीचा कोपरा, मला विचारता झाला, “राजा, खरा व्यापारी कोण ? एक - दोन रुपयांचे नुकसान (?) सोसून जीवनातील प्रत्येक लहान-सहान घटनेतून आनंद लुटणारा, सुखी, समाधानी सुमन की किरकोळ रकमेसाठी बस कंडक्टर, रिक्षा ड्रायव्हर, भाजीवाली यांच्याशी वितंडवाद घालत, अति चिकीत्सक बुद्धीने, मनातल्या मनात कुढत, चिडत आपल्या आयुष्यातील आनंद, समाधान, सुख हरवणारा तू ? 

राजा, छोट्या-छोट्या थेंबांनी भरणारे तळे जरूर साठव. पण तळ्यातले थेंब कोणते असावेत हे मात्र ठरव.” एवढे सांगून माझ्या मनातील ‘तो’ कोपराही आपल्या स्थानी परतला पण त्याचे बोल व सुमन, माझ्या अंतरंगात नेहमीसाठी वास करून राहिले.

- आजचे बोल अंतरंगाचे पूर्ण