सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ जून २०२४
सांगली कोल्हापूर भागातील कृष्णा वारणा पंचगंगा नदीच्या काठावरील नागरिक भयभीत होतो. विशेषतः कृष्णा नदी काठ 2019 पासून सतत महापुराच्या भीतीच्या छायेत वावरत असतो. याचे कारण म्हणजे 2019 साली आलेला प्रलयंकारी महापूर. या महापुराने होत्याचे नव्हते झाले. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.
यंदाही शंभर टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने, आणि मान्सूनचे आगमन झाल्यानंतर बरसलेला पाऊस याबाबत अधिकच काळजीचा संदेश घेऊन आला. त्यामुळे स्वयंघोषित हवामान तज्ञांनी यंदाही महापूर कृष्णाकाठचे दाणादाण उडवणार असे भविष्य वर्तविल्याने, सर्वचजण काळजीत पडले होते. परंतु 'कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीने' यंदा महापूर येण्याची शक्यता नसल्याचा दिलासा दिला आहे.
सांगलीचे जलतज्ञ विजयकुमार दिवाण यांनी ही माहिती दिली आहे. कोयना धरणाने सर्व नियमांचे पालन करण्याचे, तर पाटबंधारे विभागानेही संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अलमट्टीकडे आम्हा सर्वांचे लक्ष राहील. अलमट्टी धरणाच्या अभियंत्यांनी पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सांगलीकर व कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना मी आश्वस्थ करतो की, पुराचा धोका टळलेला आहे
याबाबत अधिक माहिती देताना दिवाण म्हणाले की कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीने अलमट्टी धरण व हिप्परगी या दोन्ही धरणांना भेट दिली. तेथील अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत, या दोन्ही धरणातील पाण्यावर आम्ही नियंत्रण ठेवू असे आश्वासन दिले आहे. तसेच या अधिकाऱ्याने सांगलीत पूर परिषद घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये सांगली, कोल्हापूर आणि अलमट्टी तसेच हिप्परगी धरणाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन संभाव्य महापूर रोखण्यासाठी, आम्ही सर्व अधिकारी मिळून योग्य ते नियोजन करू. त्यानुसार सांगलीचे पाठ बंधारे खात्याचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सांगलीकर नागरिकांनी आता महापुराच्या बाबत निश्वास सोडायला हरकत नाही.