| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जून २०२४
सांगलीवाडी गाव सांगली मंडल कार्यालय जोडावे अशी मागणी माजी आमदार दिनकरतात्या पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
सांगलीवाडी हे गाव कसबे डिग्रज मंडळ कार्यालयाला जोडले असल्यामुळे सांगलीवाडीतील शेतकरी, विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांना महसुली दाखल्यासाठी खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन सांगलीवाडी हे गाव सांगली मंडल कार्यालयास जोडावे अशी मागणी केली होती. त्यावेळी मंत्री महोदयांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
सांगलीवाडी सांगली मंडल कार्यालय जोडले गेल्यास प्रशासकीय कामासाठी नागरिकांना कसबे डिग्रजला हेलपाटे मारावे लागणार नाहीत. त्यामुळे नागरिकांचा त्रासही कमी होणार आहे. आणि म्हणूनच माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांचे सांगलीवाडीकर नागरिकांकडून कौतुक होत आहे.