yuva MAharashtra तुकाराम महाराजांच्या वंशजांचा थेट विरोध; म्हणाले...

तुकाराम महाराजांच्या वंशजांचा थेट विरोध; म्हणाले...


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १७ जून २०२४
आषाढ महिना सुरू झाला की वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीचे वेध लागतात. राज्यातील अनेक खेड्यापाड्यातून लाखो वारकरी पायी वारी करत चंद्रभागेच्या वाळवंटात पोहचतात. यावेळी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंडीला प्रत्येकी वीस हजार रूपयांचं अनुदान देण्याची घोषणा एकनाथ शिंदेंनी केली आहे. या अनुदानाला आता संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रशांत महाराज मोरे यांनी विरोध केला आहे.

काय म्हणाले प्रशांत महाराज मोरे ?

शासनाच्या 20 हजार मदतीवर वारी म्हणजे वारी या भक्तीरसपूर्ण शब्दावर आणि परंपरेवरच आघात आहे. यामुळे निष्काम वारी पासून दिंडी आणि वारकरी दुरावणार आहे. पंढरीची वारी ही एक साधना आणि व्रत आहे. त्यामुळे पंढरीची वारी आहे माझे घरी, पण ती शासनाच्या 20 हजारी उपकारावर, अशी लाजीरवाणी परिस्थिती निर्माण होणार आहे. छत्रपती शिवरायांनी पाठवलेला नजराणा तुकोबारायांनी स्पर्श न करता परत पाठवला होता आणि तुमचे येर वित्त धन । ते मज मुत्तीके समान॥ असा त्या धनाचा माती म्हणून उल्लेख केला होता. त्यामुळे जगद्गुरु तुकोबारायांचा आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा वारीत गजर करणारा खरा वारकरी किंवा दिंडी प्रमुख अशी शासनाकडे कोणतीही मागणी करणार नाही. कारण त्यांना तुकोबारायांनी सांगितले आहे हात पसरी जिणे धिग त्याचे॥ हे खरे राजकारणी पण दाखवायला वारकरी अशा स्वहीताचा धंदा करणाऱ्या लोकांची मागणी आहे.


वारीची परंपरा ही हजार वर्षा पासून चालू आहे. संसार सोडून निरपेक्ष भावनेने हे वारकरी पंढरीची वारी करीत आहेत. स्वकमाईतून दिंडीला 500 ते काही हजार त्या वारकऱ्याकडून भिशी दिली जाते. अनेक ठिकाणी दिंड्यांच्या पंगती ठरलेल्या असतात. अनेक ठिकाणी अन्नदात्यांकडून अन्नदान केले जाते. त्यामुळे पंढरीच्या वारकऱ्यांना या 20 हजाराच्या मदतीची आवश्यकता नाही. तो निधी सरकाराने वारीच्या वाटेवर सोई सुविधांसाठी किंवा इतर मदतीसाठी खर्च करावा. खरा आचार, विचार आणि उच्चार करणाऱ्या पंढरीच्या वारकऱ्यांनी ही मदत स्विकारु नये. किंवा शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी प्रशांत महाराज मोरे यांनी केली आहे.